भंडारा - केंद्रात भाजपची सत्ता नकोशी झाल्यावर आम्ही सर्व एकत्र येत तिसरी आघाडी तयार करत आहोत. त्यासाठी माझे तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (Telangana CM KCR) यांच्यासोबत बोलणे झाले असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले आहे. देशात भाजपविरोधी आघाडी तयार करत असताना यात काँग्रेसला सोबत घेण्यासाठी विरोध होत आहे. तसे प्रयत्न केले जात असल्याच्या चर्चांचे नाना पटोले यांनी खंडन केले आहे.
भाजपकडून आघाडी सरकारची पर्यायाने महाराष्ट्राची बदनामी केली जात आहे. सध्या विरोधी भाजप पक्षामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा स्थर अतिशय खाली गेला असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
- मनुवादी व्यवस्थेविरुद्ध आम्ही एकत्रित येऊ-
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत माझे बोलले झाले आहे. मी दौऱ्यावर असल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत. आम्ही स्त्रीशक्तीचा अपमान करणाऱ्या मनुवादी व्यवस्थेविरोधात एकत्र आल्याचे पटोले यांनी सांगितले आहे. भाजपची सत्ता आता सर्वांनाच नकोशी झाल्याने सर्व पक्ष एकत्रित येत असल्याचे यावेळी नाना पटोले यांनी सांगितले.
- महाविकास आघाडीला बदनाम करण्याचे राजकारण -
भाजपकडून सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम सुरु आहे. हा प्रकार थांबला पाहिजे, कारण यामुळे केवल मनोरंजन सुरू आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांचे 19 बंगले असल्याचा आरोप भाजपकडून केला. मात्र, तिथले बंगलेच गायब झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बदनाम करणाऱ्यांचा विरोध करायला पाहिजे, असेही नाना पटोले म्हणाले. संजय राऊत यांच्या आरोपांची मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याच्या तपास यंत्रणेकडून तपास करण्याची गरज असल्याचे नानां पटोले म्हणाले.
- विदर्भात शिवसेनेचे स्वागतच -
येणाऱ्या काळात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी शिवसेनेमध्ये संघटनात्मक बदल केले जात आहेत. येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना जर स्वतंत्र लढल्यास विदर्भात काँग्रेससाठी शिवसेना हे प्रबळ विरोधी ठरू शकते का? असे विचारले असता नाना पटोले यांनी या प्रश्नाला बगल देत केवळ 'शिवसेनेचे विदर्भात स्वागत असल्याचे' ते म्हणाले.