भंडारा - जंगलात नैसर्गिक पद्धतीने उगवणारे मशरुम बाजारात विक्रीसाठी आले असून तब्बल 500 रुपये किलो प्रमाणे त्यांची विक्री सुरू आहे. मटनापेक्षा महाग असून देखील या मशरुमांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. तर वर्षातून एकदाच मिळणाऱ्या आणि प्रथिने युक्त असलेल्या मशरुमवर नागरिक आवडीने ताव मारत आहेत.
दरवर्षी श्रावण महिन्याच्या काळात भंडारा जिल्ह्यातील बाजारात ओला मशरूम विक्रीस येतो याला सात्या किंवा भोम्बोड्या म्हणून देखील ओळखले जाते. मशरूमचे उत्पादन कृत्रिम पद्धतीने केले जाते. मात्र, सात्या हा प्रकार जंगल भागात लहान लहान खोडावर आढळून येतो. मशरुमचा हा प्रकार नैसर्गिक पद्धतीने उगवत असला तरी बाजारात त्याची किंमत आणि मागणी खूप आहे. या मशरुमांची विक्री ठोक आणि किरकोळ प्रकारात केली जाते. मागील 2 दिवसांपासून रस्त्याच्या कडेला विक्रते याची विक्री करताना दिसत आहेत.
श्रावण महिन्यात मांसाहार टाळणाऱ्या बहुतांश लोकांसाठी हा खाद्य प्रकार एक चांगला पर्याय असल्याने, 500 रुपये किलो दर असून देखील खवय्ये मोठ्या आवडीने या मशरुमची खरेदी करतात. प्रथिने युक्त, पौष्टीक आणि वर्षात एकदाच उपलब्ध होणाऱ्या या मशरुमांची महिनाभरात 800 ते 1000 किलो मालाची विक्री संपूर्ण जिल्ह्यात होते. अत्यंत चविष्ट असलेले हे मशरुम कितीही महाग असलेत तरी आम्ही खातो, अशी प्रतिक्रिया स्थानिक खवय्यांनी दिली आहे.