भंडारा - स्नानगृहातील पाण्याच्या टाक्यात 26 दिवसाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने पवनी तालुक्यातील परिसरात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा तपास लागला आहे. 2 मुली नको असल्याच्या कारणावरून आईनेच पोटच्या मुलीचा जीव घेतल्याचे कबूल केले आहे. त्यामुळे मारेकरी कोण या चर्चेला आज (शनिवार) पूर्णविराम मिळाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक करून कोर्टात हजर केले आहे.
अल्फीया आणि निश्चय रामटेके यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांचा सुखी संसार सुरू होता. त्यात आणखी भर पडली. जेव्हा अल्फीया ही गरोदर असल्याचे समजले त्यांच्या आनंद गगणात मावेनासा झाला. मात्र, आई बनण्याचा आनंदच दुःखाचा डोंगर निर्माण करेल असा कोणीही विचार केला नसेल. मात्र, अल्फीयाने जुळ्या मुलींना जन्म दिला. मात्र, आई अल्फीयाला दोन मुली नको असल्याने व जुडवा मुलींची देखभाल करताना दमछाक होत होती. अशाही परिस्थितीत कुटुंबातील अन्य सदस्य दोन्ही मुलींची देखभाल चांगल्या प्रकारे करीत असतानाही जन्मदात्या आईच्या मनात भलतेच काही शिजत होते. अशातच 22 जुनच्या सायंकाळी घरातील व्यक्ती कामानिमित्त बाहेर गेल्याचे हेरून जन्मदात्या आईने पोटच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केले.
घरातील मंडळी परत येताच मी शौचास गेली असता जुळ्या मुलींपैकी एकीला कुणीतरी उचलून नेले असल्याचा बनाव तिने केला. घरच्यांची दिशाभूल करून शोधाशोध करण्याचा कांगावा करीत स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, अल्फीयाचा दीर अक्षय निजाम रामटेके यांने तक्रार करताना अल्फीयाची दोन मुलींचा सांभाळ कतराना चिडचीड होत असे. तिला दोन मुली नकोशा झाल्याचा संशयही व्यक्त केला होता. हा संशय खरा ठरला असून, जन्मदाती माता ही कुमाता निघाल्यामुळे परिसरात संताप व्यक्त केल्या जात आहे.
या घटनेनंतर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्वतः लक्ष देऊन अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधीक्षक अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांना त्वरित सखोल चौकशी करू गुन्हेगार शोधून काढण्याचे आदेश दिले. सुरूवातीला उडवाउडवीची उत्तर देणाऱ्या अल्फीयाची कसून चौकशी केली असता, तिने गुन्हा कबूल केला. दोन्ही मुलीच असल्याने आणि त्यांचा सांभाळ करणे कठीण असल्याने एकीची पाण्यात घालून हत्या केली असल्याचे तिने सांगितले. 5 दिवसात प्रकरणाचा छळा लावीत आरोपी महिलेस जेरबंद केले असून न्यायालयात हजर केले आहे.