भंडारा - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ' मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन', हे वाक्य सोशल मीडियावर चांगलेच गाजले. आता राज्यात भाजप सरकार जाऊन महाविकासआघाडीचे सरकारही आले. तरीही फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन'ची चर्चा अजूनही थांबलेली नाही. भंडारा जिल्याच्या कोका अभयारण्यातील अधिकाऱयांना याचा नुकताच प्रत्यय आला. अभयारण्यात फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाने फिडबॅक फॉर्मवर 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असा प्रतिसाद देत, कोका अभयारण्यातील वन्यप्राणी आणि जैव विविधतेला दाद दिली.
भंडारा-गोंदिया जिल्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात कोका अभयारण्याचा समावेश आहे. जंगल सफारी झाल्यानंतर पर्यटकांना अभयारण्य कसे वाटले, काही सूचना असल्यास त्या नमूद करण्यासाठी फिडबॅक फॉर्म भरून मागितला जातो. या फॉर्ममध्ये भंडारा जिल्ह्यातील दीपक साखरकर या पर्यटकाने फिडबॅक फॉर्ममध्ये अभयारण्यात आलेले अनुभव व अमूल्य सूचनेच्या रकान्यात 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, असे तीनदा लिहून अभयारण्य व वन्यप्राण्यांबद्दलचे प्रेम व्यक्त केले.
हेही वाचा - BIG BREAKING : हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्कांउटर
दीपक साखरकर यांना कोका अभयारण्याची सफारी प्रचंड आवडली. याच अभयारण्याला पुन्हा भेट देण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यांनी 'मी पुन्हा येईन' असे फिडबॅक फॉर्ममध्ये लिहिले.
या अभयारण्यात वाघ, बिबट्या, अस्वल, हरीण, नीलगाय या वन्यप्राण्यांसह सुमारे २०० प्रकारचे पक्षी, ५० प्रकारची फुलपाखरे, एक हजार प्रकारच्या वनस्पती आहेत. याशिवाय अजनी हमेशा, राजडोह तलाव याठिकाणी बारमाही पाणी असल्याने वन्यप्राण्यांचे हमखास दर्शन होते. विशेषत: वाघांसाठी हा अभयारण्य प्रसिद्धीच्या झोतात आलेला असून दररोज पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होत असते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर नसले तरी त्यांचा डायलॉग अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापरही लोक करत आहेत, असे या प्रसंगावरून दिसून येते.