भंडारा : स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांनी पवनी पोलीस स्टेशन यांच्या मदतीने दुचाकी चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. तसेच, त्यांच्याकडून तब्बल 41 दुचाकी जप्त केल्या आहेत. जवळपास 12, 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भंडारा जिल्ह्यातील दुचाकी चोरीविरोधातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. प्रमोद अंबादास रंगारी (45, भोजपूर तालुका पवनी) आणि दीपक दत्तू व्यास (45, तामसवाडी ता. पारशिवनी जिल्हा नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधून चोरल्या गाड्या-
भंडाऱ्यात अटक केलेल्या या दोघांनाही कमी दिवसांत जास्त पैसे कमवायचे होते. या दोन्ही चोरट्यांनी महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, औरंगाबाद आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक या ठिकाणाहून या दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे.
चोरीच्या गाड्या विकायचे ग्रामीण भागात -
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात मागील काही महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील हिरो स्प्लेंडर, हिरो प्लेझर या गाड्या दिसायला लागल्या होत्या. यासंदर्भात गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांना या चोरांना पकडण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी कामाला लागले. त्यानुसार, त्यांना प्रमोद रंगारी हा काही दिवसांपासून वेगवेगळ्या गाड्या घरी आणतोय आणि कमीत कमी किंमतीत पवनी तालुक्यातील ग्रामीण लोकांना विकत आहे हे कळाले.
26 तारखेला चोरलेल्या दुचाकीमुळे चोरी उघड -
26 तारखेला पवनी तालुक्यातील आसगाव येथील एक दुचाकी चोरीला गेली होती. दुचाकी दोन इसमांनी चोरून नेल्याचे एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने ही दुचाकी दुसऱ्या दिवशी आरोपी प्रमोद रंगारीच्या घरी असल्याचे शोधून काढले. त्यानंतर रंगारीला अटक केली. त्याच्याकडून संपूर्ण माहिती मिळविण्यात आली. तेव्हा प्रमुख आरोपी दिपक दत्तू व्यास याला अटक करण्यात आली. या दोन्ही आरोपींनी दुचाकी कुठून चोरी केल्या होत्या आणि कुठे विक्री केल्या, याची कबुली दिली. त्यानंतर चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
41 दुचाकी जप्त-
या सराईत गुन्हेगारांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाने आणि पवनी पोलिस विभागाने माहिती घेऊन तब्बल 41 दुचाकी शोधून जप्त केल्या आहेत. जवळपास 12 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यापैकी बऱ्याच दुचाकीवर त्यांच्या मूळ नंबर प्लेट बदलवून नवीन नंबर प्लेट लावण्यात आल्या आहेत. आता गाड्यांचे इंजिन नंबर घेऊन त्यांच्या मालकांचा शोध घेतला जाईल. ज्या पोलीस स्टेशनमध्ये गाडी चोरीचा रिपोर्ट लिहिला आहे, तिथे या गाड्या पोहोच केल्या जातील, असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी सांगितले आहे.
दुचाकी घेताना नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज-
आज घडीला नवीन दुचाकी घेतल्यास जवळपास 80 ते 1 लाख रुपये खर्च येतो. असे असताना केवळ दहा ते वीस हजार रुपयात जर दुचाकी मिळत असेल, तरा अशा दुचाकी घेताना ग्रामीण भागातील लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कारण, अशा बहुतांश गाड्या चोरीच्या असू शकतात. त्यामुळे गाड्यांची खरेदी-विक्री करताना त्यांच्या मूळ कागदपत्रांची पाहणी करून घ्यावी, असेही पोलिसांनी आवाहन केले आहे.
हेही वाचा - लोकल, बस प्रवासावर येणार निर्बंध; राज्य सरकारची नवी नियमावली दोन दिवसांत
हेही वाचा - परमबीर सिंग याचिका सुनावणी : "तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात"; न्यायालयाची सिंगांवर बोचरी टीका