कर्जमुक्तीची दुसरी यादी जाहीर, भंडारा जिल्ह्यातील 25 हजार 250 शेतकऱ्यांचा समावेश - महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२०
शनिवारी जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या यादीत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २५ हजार २५० शेतकरी सभासदांची नावे आहेत. जाहीर झालेल्या याद्या सेवा सहकारी सोसायटी, आपले सेवा केंद्र, ग्रामपंचायत, बँक शाखेत लावण्यात आल्याचे समजते.
भंडारा - महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रयोगीक तत्वावर २४ फेब्रुवारी रोजी यादी जाहीर करण्यात आली होती. यात भंडारा जिल्ह्यातील २४० शेतक-यांचा समावेश होता. राज्य शासनाने शनिवारी (ता. २९) दुसरी यादी जाहीर केली असून यात जिल्ह्यातील सात तालुक्यातील २५ हजार २५० शेतक-यांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यातील ३४ हजार ३८२ शेतक-यांची माहिती कर्जमाफीच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ करण्यात आली होती.
राज्य शासनाने विशिष्ट काल मर्यादा ठेवीत दोन लाखापर्यंतच्या पीक कर्जाची मुद्दल आणि व्याज अशी रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला. या कर्जमाफी योजनेची घोषणा करण्यात आल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी शासनाने प्रायोगिक तत्वावर काही गावातील शेतक-यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. यात भंडारा जिल्ह्यातील शहापूर आणि सिल्ली गावातील २४० शेतक-यांचा समावेश होता. यादी जाहीर झाल्यानंतर शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करुन घेतले होते.
दरम्यान शनिवारी जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या यादीत जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २५ हजार २५० शेतकरी सभासदांची नावे आहेत. जाहीर झालेल्या याद्या सेवा सहकारी सोसायटी, आपले सेवा केंद्र, ग्रामपंचायत, बँक शाखेत लावण्यात आल्याचे समजते. यादीत नाव असलेल्या शेतक-यांना आता आधार प्रमाणिकरण करावयाचे आहे. हे झाल्यानंतर शेतक-याच्या कर्ज खात्यात माफ झालेली रक्कम वळती होऊन शेतकरी लाभार्थी ठरणार आहे.
भंडारा जिल्हयातील ३४ हजार ३८२ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी संकेतस्थळावर माहिती अपलोड केली होती. त्यातील काही शेतक-यांची वेगवेगळ्या कारणांनी छाटणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यानंतरही यादी येऊन पात्र शेतकरी पुढे येण्याचे नाकारता येत नाही. आधार प्रमाणिकरणानंतर कर्जमुक्ती होत असल्याने शेतक-यांमध्ये उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
जाहीर झालेल्या यादीत आपले नाव पाहून, नाव असल्यास शेतक-यांनी आधार कार्ड, पासबुक आणि विशिष्ट क्रमांक सोबत घेऊन जात आपले सेवा केंद्रातून आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. हे झाल्यानंतर कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळेल. त्यामुळे आधार प्रमाणिकरण करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे देशकर यांनी केले आहे.
TAGGED:
भंडारा जिल्ह्यातील बातम्या