भंडारा : जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील रेंगेपार ग्रामपंचायतने गावकऱ्यांसाठी एक अभिनव प्रयोग सुरू केलेला आहे. पुरस्कार निधीतून मिळालेल्या पैशातून सोलर वॉटर हिटर सिस्टम लावून गावकऱ्यांना नि:शुल्क गरम पाणी देत ( Free hot water By Rengepar Grampanchayat ) आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे गावात गरम पाण्यासाठी चूल पेटविण्याचा प्रकार बंद झाला असून यामुळे जंगलाचेही संरक्षण झाले आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबला. तसेच चुलीच्या धुरामुळे महिलांना होणारा त्रासापासून मुक्ती मिळाली आहे.
गरम पाण्याचा अभिनव उपक्रम - 2018-19 मध्ये रेंगेपार या गावाला स्मार्ट ग्रामपंचायतचा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्काराची काही रक्कम शिल्लक होती. या शिल्लक रकमेतून 2,98,000 रू खर्च करून 1500 लिटर क्षमतेचा सोलर वॉटर हिटर बसविले. भाऊबीजच्या दिवशी हे सुरू करून गावातील महिलांना ही ओवाळणी दिली. आज जवळपास 120 कुटुंब याचा फायदा घेत आहेत. सकाळी 6 ते 10 वाजे पर्यंत ही सुविधा उपलब्ध केली जात. प्रायोगिक तत्वावर हे आम्ही सुरू केले होते. मात्र गावकऱ्यांचा उदंड प्रतिसाद आम्हाला मिळाला. सकारात्मक बदल आणि पर्यावरणाचे संरक्षण साध्य होण्याच्या दृष्टीने एक चांगले पाऊल दिसत असल्याने भविष्यात गावातील उर्वरित लोकांसाठी इतर भागात अजून तीन सोलर वॉटर सिस्टम बसवू, असे रेंघेपार ग्रामपंचायतीचे सरपंच मनोहर बोरकर यांनी सांगितले.
अडचणींवर उपाय शोधला - पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये गावात पाणी गरम करण्यासाठी चुलीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. यासाठी गावकरी सरपन गोळा करण्यासाठी जंगलात जातात बरेचदा झाडांची कत्तल ही केली जाते. तसेच पेटवलेल्या चुलीच्या धुरामुळे संपूर्ण गावात प्रदूषण होतो आणि चूल पेटवणाऱ्या महिलांना या धुराचा त्रास सहन करावा लागतो.रेंघेपार सरपंच मनोहर बोरकर यांना सर्व अडचणींवर उपाय काढण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला.