भंडारा- शहरात मागील वर्षभरापासून मोकाट जनावरांचा उच्छाद सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या नगरपरिषदेवर मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावण्याची जबाबदारी असते त्यांच्याच कार्यालयासमोर जनावरे मोठ्या प्रमाणात बसून राहत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, नगरपरिषदेला याचे काहीच सोयरकसुतक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यात निर्लज्ज कोण, रस्त्यावर बसलेले जनावरे, राजकीय नेते, नगर परिषद अधिकारी, की जनावरांचे मालक असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
बुधवारी सकाळपासून आठ ते दहा जनावरे गांधी चौकामध्ये मधोमध येऊन बसली होती. या चौकामध्ये नगरपरिषदचे कार्यालय आहे. कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांपासून चपराशीपर्यंत सर्वजण त्याच ठिकाणावरून आले असतील. मात्र यापैकी कोणालाही जनावरांना तिथून हटविण्याचा किंवा कांजी हाऊसमध्ये नेण्याचा विचार आला नाही. रात्री उशिरापर्यंत ही जनावरे तेथेच बसून होती. जनावरांनी रस्ता अडवून धरल्याने रहदारीसाठी लोकांना मोठी अडचण जात होती.
काम झाल्यानंतर मालक जनावरांना मोकाट सोडून देतात. त्यांनतर त्यांचा कोणीच वाली राहत नाही. अशा मुक्या जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शहराच्या प्रत्येक मोठ्या रस्त्यांवर चौकांमध्ये हे मोकाट जनावरे पाहायला मिळतात. या जनावरांमुळे बरेचदा अपघात झालेले आहेत. काही लोकांना गंभीर दुखापत झाली तर काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
या विषयी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी पोहोचले तेव्हा मुख्याधिकारी उपलब्ध नव्हते. नगराध्यक्ष खासदार झाले तेव्हापासून नगरपालिकेची वारी बंद झाली आहे, तर उपाध्यक्ष यांनी यावर बोलण्यास नकार दिला.
या मोकाट जनावरांवर, त्यांच्या मालकांवर कधी तरी कारवाई होणार आहे का? की सर्वच गांधारीच्या भूमिकेत शहरात फिरणार आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.