भंडारा- पवनी येथून २ किलोमीटर अंतरावर सिंदपुरी येथे शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहाचे अधीक्षक कामावर उपस्थित राहत नाही. ते वसतिगृहाच्या आवारात गावकऱ्यांना अनधिकृतपणे गुरे चारण्याची परवानगी देऊन मोकळ्या जागेत स्वतः साठी गहू पिकाची लागवड करतात. त्यांच्या या वर्तनामुळे मुलींचे भविष्य अंधारात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे, अधीक्षकावर करावाईची मागणी सिंदपुरी गावाचे सरपंच, उपसरपंच यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
अधीक्षक सुजाता रामटेके या वसतिगृहात वास्तव्य न करता नागपूरवरून ये-जा करतात. त्यामुळे, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना मूलभूत गरजांची पूर्तता होते नाही. तसेच, वसतिगृहाचे आवार हे खूप विस्तीर्ण असून अधीक्षकांकडून या जागेत गावातील गुराख्यांना मोकळीक दिली जात आहे आणि काही जागेत स्वतः साठी गव्हाची शेती केली जात आहे. शेतीला पाणी देण्याचे व कापणीची संपूर्ण कामे हे वसतिगृहातील सफाई कामगारांकडून केल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला असून खबरदारी म्हणून या वसतिगृहात हैदराबाद येथून बालाघाट येथे जात असलेल्या १९ मजुरांचे विलगीकरण करण्यात आले आहे. या मजुरांची संपूर्ण व्यवस्था करण्याची जबाबदारी ही वसतीगृहातील अधीक्षकांची आहे. अधीक्षक वसतिगृहात उपस्थित नसल्याचे जिल्हाधिकारी यांच्या भेटीदरम्यानदेखील दिसून आले. वसतिगृहाच्या अधीक्षक सुजाता रामटेके यांना गावातील पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वसतिगृहाविषयी काही तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रामटेके यांनी त्यांना उद्धटपणे बोलून फोन कट केले होता. या सर्व प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंदपुरीचे उपसरपंच हेमंत मेनवाडे यांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून वसतिगृहाचे अधीक्षक सुजाता रामटेके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.