भंडारा - जिल्ह्यात कोविड मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यादृष्टीने कोरोना रुग्णांना लागणाऱ्या सुविधा कमी पडत आहेत. रुग्णांच्या मदतीसाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी मदत करत असतानाही ही मदत तोकडी पडत आहे. तेव्हा कोविड रुग्णांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ आहे. वाढत्या कोविड प्रादुर्भावामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे. अनेक सोईसुविधांचा अभाव असल्याने रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी लाखनी तालुक्यातील विद्यादानाचे कार्य करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या 'साद माणुसकीची समूह लाखनी' व इतर सहृदयी शिक्षकांनी पुढाकार घेत कोरोना रुग्णांसाठी लागणारे दोन लाखांचे साहित्य लाखनी तालुका कोविड रुग्णालयाला दिले.
तीन वर्षांपूर्वी सुरू झाला साद माणुसकीचा उपक्रम -
लाखनी तालुक्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एकत्रित येत तीन वर्षपूर्वी 'साद माणुसकीचा समूह' असा एक ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून गरजवंत लोकांना मदत करण्याचे काम मागील तीन वर्षापासून सुरू आहे. सध्या कोरोनाच्या काळात उपचार घेत असलेल्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये बऱ्याच छोट्या मात्र अत्यावश्यक गोष्टींची गरज असते, ही बाब या ग्रुपच्या सदस्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याशी संवाद साधून ही मदत करण्याची इच्छा दर्शवली.
हेही वाचा - चंद्राच्या तब्बल 55 हजार फोटोंतून साकारला एकच अद्भुत फोटो; पाहा गॅलरी..
दोन दिवसात अडीच लाख निधी तयार करून दिले साहित्य -
कोरोना रुग्णालयात दाखल असताना बऱ्याच रुग्णांकडे त्यांचे नातेवाईक मदतीसाठी नसतात तर बरेच रुग्ण हे खूप लांबून आलेले असतात, त्यामुळे अशा सर्व रुग्णांच्या नेमक्या गरजा काय हे लक्षात घेऊन 'साद माणुसकीचा' ग्रुप ने कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी वॉशिंग मशीन, ऑटोमॅटिक सॅनिटायझर ड्रॉप मशीन, हॉट अँड कोल्ड वाटर मशीन, इंडक्शन मशीन, स्टील केटल, इमरजन्सी लाइट्स, सॅनिटायझर, चादर, ब्लिचिंग पावडर, हँड वॉश बॉटल्स, वॉशिंग पावडर, फिनाईल, टॉयलेट क्लीनर, बकेट्स तसेच रुग्णांसाठी किट तयार करण्यात आल्या असून त्यात आंघोळीची साबण, कपड्यांची साबन, टुथ पेस्ट, खोबरेल तेल, सॅनिटायझर बॉटल, मास्क, गूळ, शेंगदाने असा अत्यावश्यक साहित्याची पॅकिंग करून देण्यात आली. इतरही अत्यावश्यक साहित्य संकलित निधीतून रुग्णांसाठी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हेही वाचा - गोव्यात कोरोनामुळे आणखी 31 जणांचा मृत्यू, कर्फ्यू वाढवण्याबाबत शनिवारी निर्णय
तहसीलदार आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केली स्तुती -
आपले सामाजिक दायित्व ओळखून या कठीण काळात या समूहातील सदस्यांनी व इतर सहृदयी शिक्षकांनी हिरिरीने निधि संकलित करत कोविड रुग्णांना सर्वतोपरी प्रत्यक्ष मदत केली, हे स्तुत्य व अभिमानास्पद कार्य आहे असे तहसीलदार मल्लिक विराणी यांनी सांगितले. "साद माणुसकीचा" यांनी कोविड रुग्णांना जो मदतीचा हात दिला तो कौतुकास्पद आहे. आपणही समाजातील एक घटक असून गरजूंना मदत करण्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली ही विशेष उल्लेखनीय बाब आहे असे त्यांनी सांगितले.
आम्ही ज्ञानदानाचे कार्य करत असताना आम्हीही या समाजाचे घटक असून आपली नैतिक जबाबदारी व सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून आम्ही एकत्रित आलो व सर्वजण सोबतीने सामाजिक कार्य करत आहोत. विशेष म्हणजे कोविडची तीव्रता वाढल्यास आपले सामाजिक दायित्व निभावण्यासाठी 'साद माणुसकीची समूह लाखनी' व इतर शिक्षक कुठेही कमी पडणार नाहीत. रुग्णांना सर्वतोपरी भरीव मदत करू असे आश्वासन समूह प्रमुख पुरुषोत्तम झाडे यांनी दिले आहे.