भंडारा - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 13 जानेवारीला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन जळीतकांडाविषयीची माहिती जाणून घेतली. तसेच अग्निकांडात वाचलेल्या पालकांशी भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
राज्यपाल भंडाऱ्याच्या दौऱ्यावर
राज्यपाल कोश्यारी यांनी बुधवारी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची चर्चा केली. अग्निकांडांतील संबंधित बालकांच्या पालकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच घटनास्थळी जाऊन आढावा घेतला.
आतातरी अहवाल मिळेल
या चौकशी अहवालाची नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. चौकशी अहवाल कोश्यारी आल्यानंतर तरी लवकरात लवकर पुढे येईल, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत. घटनेच्या तिसऱ्या दिवशी अहवाल सादर करू, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. मात्र आज पाचवा दिवस उजाडल्यावरही चौकशी अहवाल अजून आलेला नाही.
नेत्यांच्या फेऱ्या अजूनही सुरूच
शुक्रवारच्या रात्री झालेल्या अग्निकांडानंतर मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देत आहेत आणि प्रत्येक जण लवकरच चौकशी अहवाल पुढे येईल आणि योग्य ती कार्यवाही होईल, असे सांगताना दिसतात. मात्र अहवाल अजून आलेला नाही.