भंडारा - लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथील सर्पमित्राने रेस्क्यू केलेल्या घोणस जातीच्या विषारी मादीने सर्पमित्राच्या घरी तब्बल 59 पिल्लांना जन्म दिला. ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांनी गर्दी केली. जिल्ह्यात पहिल्यांदाच घोणस सापाने सर्पमित्रांच्या घरी एवढ्या मोठ्या प्रमाणात पिल्लांना जन्म दिला आहे. या मादी आणि तिच्या पिल्लांना वनविभागाच्या देखरेखीत जंगलात सोडण्यात येणार आहे.
पवनी तालुक्यातील चकरा गावात भास्कर तिरपुडे यांच्या घराशेजारी घोणस जातीचा साप असल्याचे समजताच त्यांनी लाखनी तालुक्यातील सर्पमित्र समित हेमने यांना साप पकडण्यासाठी बोलवले. समितने त्याचे दोन सर्पमित्र संदीप शेंडे व रोशन नैताम या दोघांना घेऊन रात्री दहाच्या दरम्यान चकरा येथे पोहोचून या घोणस सापाला सुरक्षित पकडले. घोणस जातीचा साप पकडताना ती मादी असून गर्भवती असल्याचे सर्पमित्राच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी लाखनीला परत येऊन एका मोठ्या टँकमध्ये तिला सुरक्षित आपल्याच घरी ठेवले.
रात्रभरात या मादींनी एक-दोन नाही तर तब्बल 59 पिल्लांना जन्म दिला. सर्पमित्रांच्या दृष्टीने हे अतिशय दिलासा आणि आनंद देणारी घटना होती. त्यांनी स्वतःही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने घोणसच्या पिल्लांना एकत्रित बघितले आहे. तर घोणस प्रजातीच्या विषारी सापाने सर्पमित्राकडे पिल्ले दिल्याची अशी घटना जिल्ह्यातही प्रथमच अनुभवण्यास आली आहे. त्यामुळे अनेक सर्प अभ्यासकांनी या ठिकाणी भेटी दिल्या आहेत.
या अगोदर सापाच्या अंड्यांना कृत्रिमरीत्या 21 पिलांना जन्माला घालण्याची घटना सर्पमित्रांच्या घरी झाली होती. घोणस जातीचा हा साप एरवी शेतात मोठ्या प्रमाणात दिसतो. हा साप नागापेक्षा सहापट जहाल विषारी साप आहे. मे ते जून या दरम्यान हा पिलांना जन्म देतो. हा साप कमीत कमी सहा ते जास्तीत जास्त 65 पर्यंत पिल्लांना एकाच वेळेस जन्म देऊ शकतो. पिलांना आणि मादीला वन विभागाच्या देखरेखीत जंगलात सोडले जाणार असल्याची माहिती सर्पमित्राने दिली आहे. तसेच लोकांनी सापांना किंवा इतर सरपटणाऱ्या जीवाला न मारता याची माहिती सर्पमित्रांना देऊन या सर्वांचे प्राण वाचवावे, अशी विनंती सुद्धा सर्पमित्रांनी केली आहे.