भंडारा - तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून, या गावाला लागून मध्यप्रदेशची सीमा आहे. या ठिकाणी वनविभागाचा तपासणी नाका आहे. पण तपासणी फाटक नसल्याने कोणत्याच गाडीची तपासणी होत नाही. त्यामुळे अवैध तस्करी करणाऱ्यांसाठी अधिकारी हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
महाराष्ट्राच्या या सीमेवर वनविभाग व पोलीस विभागाची चौकी बनविण्यात आली आहे. पण मध्यप्रदेश मधून येणाऱ्या वाहनांची तपासणी करेल तरी कोण अशा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याला कारणही तसेच आहे. या ठिकाणी वनविभागाने तपासणी नाका तयार केला असून, काही दिवस या नाक्यावर तपासणी सुद्धा करण्यात आली. मात्र एक वर्षापूर्वी तपासणी नाक्यावरील लोखंडाचा खांब तुटला.
स्थानिक अधिकाऱ्यांनी याची रीतसर तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, मागील एक वर्षापासून याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. या सर्व प्रकारामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहनांना अडवायचे काय असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला आहे. तर ही बाब वरिष्ठ अधिकऱ्यांना माहित असूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. या सीमेवरून मध्यप्रदेशमधून बनावट दारू, चोरीची वाळू, लाकडे, इतरही साहित्य महाराष्ट्रात आणले जात आहे. त्यामुळे सीमेची जवाबदारी ही रामभरोसे असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र मध्यप्रदेश यांची सीमा खुली असल्यामुळे अवैध काम करणाऱयांना मोकाट रान मिळाले आहे. हे गेट तुटल्यावर नवीन गेट बसविण्यासाठी १८ हजार रुपये खर्च येतो. मात्र वन विभागाचे वरिष्ठ गेट लावण्याचे मुद्दाम टाळत असल्याने, या अवैध धंदे करणाऱ्यासह यांचे साटेलोटे असल्याचा आरोप होत आहे. याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी अधीक बोलण्यास नकार देत लवकरच गेट लावू असे सांगितले.