भंडारा - गणेश चतुर्थीच्या महुर्तावर भंडारा जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाने आगमन केले आहे. बाप्पा आणि पाऊस दोन्हीही घरी आल्यामुळे भक्तही खुश असल्याचे पाहायला मिळाले. दीड वाजेपर्यंत बाप्पाच्या स्थापनेचा मुहूर्त असल्यामुळे प्रत्येक भक्त बाप्पाला घरी आणण्यासाठी आतुर होता. मात्र, पाऊस आल्यामुळे बाप्पाला घरी आणण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणी येत होत्या.
सोमवारी रात्रीपासूनच पावसाने रिपरिप सुरु केली होती. सकाळीही पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे सुरुवातीचा काही काळ लोकांनी पाऊस थांबण्याची वाट बघितली. मात्र, दीड वाजताचा मुहूर्त निघून जाऊ नये, म्हणून भक्तांनी बाप्पांना घरी पावसातच घरी आणले.
यावर्षी भंडारा नगरपरिषदेने पीओपीच्या मूर्तींवर पूर्णपणे बंदी आणली आहे. मातीच्या सर्व मूर्त्यांची विक्रीही दसरा मैदानाच्या एकाच ठिकाणाहून ठेवण्यात आली होती. शहराच्या ठिकाणी मूर्ती विक्री करताना वाहतुकीची कोंडी होत होती. त्यावर उपाय शोधत नगरपालिकेने दसरा मैदान येथे विक्री करण्याचे ठरविले. मात्र, पाऊस झाल्याने त्या मैदानात सर्वत्र चिखल साचला होता. प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार 500 रुपयापासून ते 10 हजार रुपयांपर्यंतच्या मूर्ती खरेदी केल्या.
घरगुती गणपतींसह मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणपतींची स्थापनाही संपूर्ण जिल्ह्यात होते. भंडारा शहरातील प्रसिद्ध असलेल्या गणेशपूर येथील गणपती मंडळाने यावर्षी दहा दिवसाचा गणपती न ठेवता केवळ दीड दिवसाचा गणपती ठेवला आहे. या उत्सवातून उरणारा सर्व पैसा हा सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना देण्याचे ठरविले आहे.
पुढचे दहा दिवस घरात बाप्पांचा सहवास असेल, त्यामुळे हे दहा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचे असतील. हा पाऊस आमच्यासाठी अजिबात व्यत्यय नाही, कारण या पावसाची आम्हाला आणि शेतकऱ्यांनाही खूप गरज होती, अशा प्रतिक्रिया गणेश भक्तांनी दिल्या.