भंडारा- रस्त्याच्या कडेला बसून आयुर्वेदिक दुकान थाटणाऱ्या टोळ्यांपासून सावधान राहा. हे एक मोठा रॅकेट असून या माध्यमातून लोकांना लाखो रुपयांनी लुटले जात आहे. यांची औषधी ही खरी नसून यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याविषयाची माहिती उघड करणाऱ्या त्यांच्या टोळीतील एका व्यक्तीची हत्या केल्यानंतर हा खुलासा मृताच्या आईने आणि त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
आयुर्वेदिक औषध अमृत जोहर, बालचंद्र, साल भास्कर, हिरा भस्म, सुवर्णभस्म, गर्भ पोटली रस आणि पौष्टिक रसायन यांच्या नावाने रांगोळी, राख, चकमक, खरावा अशा गोष्टी लोकांना दिल्या जातात ज्या नागरिकांसाठी हानीकारक आहेत. आणि यासाठी 50 हजार ते 2 लाखांपर्यंत पैसे वसूल केले जातात. या टोळीतील विजेश गोसावी(३२) या तरुणाची हत्या झाल्या नंतर हे सत्य समोर आले आहे.
मध्यप्रदेशच्या रायपूर इथून विजेश गोसावी याचे अपहरण झाले होते. त्या तरुणाचा भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीमध्ये 30 ऑक्टोबरला मृतदेह मिळाला. सुरवातीला ही आत्महत्या असावी असं गृहीत धरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, ही घटना आत्महत्या नसून त्याची हत्या केली गेली. आणि या हत्येमागे नागपूर येथील त्याच्या शेजारी राहणारे सद्धेव गोसावी, साधु गोसावी, देवदास गोसावी, भीमराव गोसावी आणि लखन गोसावी यांनी त्याचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा आरोप त्याच्या आईने आणि कुटुंबीयांनी केला आहे. त्याची हत्या झाली असून त्याची नोंद भंडारा पोलीस स्टेशनमध्ये व्हावी यासाठी मृताची आई मागील महिन्याभरापासून प्रयत्नशील आहे. तिला पाठबळ देण्यासाठी तिचे नातेवाईक आता भंडाऱ्यात पोहोचले आहेत. मात्र, त्याच्या नातेवाईकांना मृताच्या आईला मदत केल्यास जिवे मारण्याची धमकी मिळत आहे. या टोळीचे मुख्य ठिकाण हे महराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे.
विजेश हा आयुर्वेदिक डॉक्टर असल्याचे भासवून घरोघरी जाऊन लोकांचे उपचार करण्याच्या नावाखाली त्यांच्या टोळीने थाटलेल्या आयुर्वेदिक दुकानांमधून हजारो रुपयांचा औषधा घ्यायला लावायचा. त्या मोबदल्यात विजेशला मोबदला मिळायचा. या टोळीचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रॅकेट असून प्रत्येक जिल्ह्यात याच पद्धतीने लोकांना फसविण्याचे काम केले जात आहे.
मोठ्या प्रमाणात पैसे येत असल्याचे पाहून विजेशनेही स्वतःचे दुकान काढण्याचा विचार केला. त्यासाठी त्याने त्याच्या टोळी कडे कमिशनचे पैसे मागितले. त्याला ते दिले जात नव्हते. त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. शेवटी विजेशने या सर्व धंद्याची भांडाफोड करण्याची धमकी दिल्यानंतर विजेशच्या हत्येचे कट रचल्या गेला. रायपूर येथील किरण बुकलवार याने विजेशला हा व्यवसाय करण्यासाठी रायपूरला बोलवले आणि तिथून सर्व आरोपींनी मिळून विजेशचे अपहरण केले. आणि त्याला पोहता येत नव्हते याची माहिती आरोपींना असल्याने वैनगंगा नदीच्या पात्रात आणून जिवंत फेकले.
विजेशच्या हत्येचा योग्य तपास लावावा. आयुर्वेदिक दवाखाने आणि डॉक्टरच्या नावाने व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्वरित अटक करावी आणि लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा त्यांचा धंदा बंद करावा. अशी मागणी विजयच्या आईने आणि नातेवाईकांनी केली आहे.