भंडारा - वनविभागाच्या हद्दीतील केसलवाडा गावाशेजारील स्मशानभूमीजवळ एका अस्वली आपल्या पिल्लाला सोडून गेली होती. भंडारा वन विभागाने माणुसकी दाखवत त्या पिल्लाला जीवदान दिले आहे. मागील दोन दिवसांपासून हे अधिकारी आणि कर्मचारी त्याची जपणूक करीत आहेत. तसेच मिळालेल्या ठिकाणीच त्या पिल्लाला ठेवून त्याच्या आईच्या येण्याची वाट पाहत 24 तास पहाराही देत आहेत.
कवलेवाडा येथे गावतलावाच्या लगत असलेल्या पांदण रस्त्याच्या पाईपमध्ये अस्वलीने मादी पिल्लाला जन्म दिला. परंतु तलावाजवळ मृत इसमाच्या अंत्यविधी सुरु असताना आगीमुळे आणि मनुष्य हालचाली पाहून मादी अस्वल घाबरून पिल्लाला पाईपमध्येच सोडून जंगलाच्या दिशेने निघून गेली. अस्वली सोबत नसताना हे पिल्लू पाईपच्या बाहेर पडले. ते लोकांना दिसताच लोकांनी याबाबत माहिती भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली.
हेही वाचा - वन कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाळू तस्करांनी घातला ट्रॅक्टर; पाच जणांना अटक
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहचले. कर्मचाऱ्यांनी सर्व लोकांचा जमाव दूर करून पिल्लाला ताब्यात घेतले. त्यानंतर आजूबाजूला तपासणी केली. परंतु, तिथे अस्वली नसल्याने तसेच पिल्लू भुकेने व्याकूळ झाल्याने त्याला बाटलीच्या साहाय्याने दूध पाजण्यात आले. संध्याकाळी त्याला ज्या ठिकाणावरून उचलले त्याच पाईपमध्ये ठेवून वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचारी शासकीय वाहनात बसून सुरक्षित अंतरावरून मादी येण्याची वाट पाहत होते. पण, सकाळपर्यंत मादी अस्वल आले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा परत पिल्लाला पाईप मधून काढून दूध पाजण्यात आले. त्यानंतर परत त्याच पाईपमध्ये सोडण्यात आले. मादी अस्वल येईल व पिल्लाला घेऊन जाईल या निगराणीसाठी घटनास्थळी 'कॅमेरा ट्रॅप' लावण्यात आले पथक कवलेवाडा गावात तळ ठोकून आहे.
जर दोन दिवसात मादी अस्वल पिल्लाला घेऊन गेले नाही तर या पिल्लाला वन्यप्राणी संगोपन केंद्रात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांनी दिली.
हेही वाचा - निमंत्रण पत्रिकेत भाजप खासदाराचे नाव नसल्याने कार्यकर्ते संतप्त, शिक्षणाधिकाऱ्यांना दिला वाण