भंडारा : जिल्ह्यातील बोरी गावात वीज अंगावर कोसळल्याने एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा शेतकरी पत्नीसह शेतामध्ये काम करत होता. तुमसर तालुक्यातील बोरी गावातील अनिल सुरज भेदे (36) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सुदैवाने त्यांची पत्नी आणि शेतात काम करणारे इतर मजूर बचावले आहेत.
हेही वाचा... Mother's Day: महिलांना कुठला आलाय लॉकडाऊन ? असा प्रश्न मनात असेल तर ही बातमी नक्की पाहा
अनिल भेदे हा शनिवारी त्यांच्या शेतात पत्नी आणि 15 मजुरांना घेऊन वांगे तोडण्याचे काम करत होता. दिवसभर कडक उन होते. मात्र, सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि जोराचा वारा सुरु झाला. त्यानंतर विजांचा कडकडाट सुरू झाला. मात्र, पाऊस सुरू न झाल्याने पाऊस सुरू होण्यापूर्वी वांगे तोडण्याची घाई त्यांनी सुरु केली. मात्र, अचानक वीजेचा कडकडाट झाला आणि वीज अनिल याच्या अंगावर कोसळली. पत्नी आणि इतर मजुरांनी मिळून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
अनिल यांच्या अंगावर वीज पडली तेव्हा शेतात आणखीन 16 मजूर होते. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने ते सर्वजण बचावले आहेत. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. शासकीय नियमानुसार वीज पडून मृत्यू झाल्यास शासनातर्फे मदत मिळते. ती मदत लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अनिल यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि आईवडील आहेत. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.