भंडारा - पवनी तालुक्यातील वलनी येथे वटाण्याची मळणी करणाऱ्या मळणी यंत्रामध्ये दबून 27 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत मजुराचे नाव स्वप्निल भांडे (वय-27, राहणार बेलाटी) आहे. शनिवारी दुपारच्या दरम्यान वलणी येथील अरुण तिघरे यांच्या शेतात काम सुरू होते. यावेळी ही घटना घडली.
वटाणे वेगळे करण्याचे काम सुरू असताना, नजर चुकीने स्वप्नील भांडे याचा हात मशीनमध्ये अडकला. मशिन सुरू असल्यामुळे त्याचा हात ओढल्या गेल्याने डोके मशीनमध्ये फसून जबर मार लागला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. वाटाणा पिकाची मळणी शेवटच्या टप्प्यात असताना ही दुर्देवी घटना घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पवनी पोलीस घटनास्थळवर पोहोचले होते.
नरेश देशमुख याच्या मालकीचे हे मळणी यंत्र असून यावर 5 मजूर कामावर होते. त्यातील स्वप्नील हा एक मजूर होता. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. देशात संचारबंदी सुरू असल्याने मजुरांवर उपासमार होत आहे. त्यामुळे पोटाची खडगी भरण्यासाठी मिळेल तो काम करण्यास हे मजूर तयार आहेत. सध्या शेतात काम मिळत असल्याने स्वप्नील सुद्धा कामाला गेला मात्र दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था करण्याची ही धडपड शेवटची ठरली.