भंडारा - कोरोना संकटातील खरे योद्धा म्हणून डॉक्टरांची संपूर्ण देशात प्रशंसा केली जात आहे. त्यांना मान-सन्मान दिला जात आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यात काही डॉक्टरच्या वागण्यामुळे डॉक्टर विरुद्ध रोष निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे. कोरोना व्यतिरिक्त इतर रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे ज्या डॉक्टरला देव मनात होतो तो देव आता जाग्यावर नाही राहिला, अशी संतप्त भावना मृताचे कुटुंबीय व्यक्त करत आहेत.
ज्याला देव मानत होतो, त्या डॉक्टरने पाठ फिरवल्याने माझ्या भावाचा मृत्यू भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील प्रदीप भुरे या 47 वर्षीय तरुण व्यापाराचा हृदयविकाराने शुक्रवारच्या रात्री मृत्यू झाला. ज्या डॉक्टरकडे त्याचे सुरुवातीपासून उपचार सुरू होते. त्याच डॉक्टरने शेवटच्या वेळी उपचार देण्यास नकार दिल्याने त्या डॉक्टरच्या दारावरच प्रदीप भुरे यांनी शेवटचा श्वास घेतला.प्रदीप भुरे यांना छातीत त्रास वाढल्याने कुटुंबातील लोकांनी त्यांना उपचारासाठी प्रथम डॉक्टर कोचर यांच्याकडे नेले. डॉक्टर घरी नसल्याचे त्यांच्या कंपाउंडरने सांगितल्याने, त्यांनी डॉक्टर गादेवार यांच्याकडे उपचारासाठी नेले. मात्र, तिथेही हेच उत्तर ऐकायला मिळाले. तिथून त्यांनी डॉक्टर बाळबुधे आणि तिथून डॉक्टर कोडवानी यांच्याकडे नेले. मात्र, प्रत्येकाने उपचार देण्यास नकार दिल्याने पुन्हा डॉक्टर कोचर यांच्याकडे घेऊन आले. डॉक्टर कोचर यांच्या दवाखान्या समोरील गेट पुढे हे कुटुंबातील लोक उपचार द्या, अशी विनवणी करत राहिले. गेटच्या पलीकडून डॉक्टर हे सर्व दृश्य पाहत राहिले. मात्र, उपचार दिला आणि वेदनेने तडफडत प्रदीप भुरे यांनी डॉक्टर कोचर यांच्या समोरच प्राण सोडले. ज्याला आम्ही देव समजत होतो, तो डॉक्टर या कोरोना काळात देव राहिला नाही, अशी भावना कुटुंबातील लोकांनी व्यक्त केली.या घटनेनंतर तुमसर नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून नागरिकांच्या भावना आणि कुटुंबाच्या भावना जाणून घेतल्या. त्यानुसार या सर्व डॉक्टरांना नगरपालिकेच्या माध्यमातून नोटीस बजावल्या जाणार आहे. त्यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्यास त्यांच्या दवाखान्यासाठी दिलेली नगर पालिकेची परवानगी काढण्याचेही विचार या बैठकीत झाले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांची माणुसकी सोडू नये, प्रत्येक रुग्णांना वाचविण्याची जबाबदारी ही त्यांची आहे. त्यामुळे या पुढे तुमसर तालुक्यात हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे प्रदीप पडोळे यांनी सांगितले.गरजवंत रुग्णांना योग्य वेळी उपचार न देणारे डॉक्टरांचा प्रकार म्हणजे अमानवीय कृत्य असल्याचे खुद्द आयएमएचे जिल्हा सचिव यांनी मान्य केले. तुमसर तालुक्यात वाढणारा मृत्यूदर हा आरोग्य यंत्रणेमध्ये असलेले कमतरतेमुळे होत असावा असे त्यांनी सांगितले. प्रत्येक डॉक्टरने त्याच्या दवाखान्यात कोविड आणि नॉन कोविड वार्ड तयार करून प्रत्येक रुग्णांना मग तो कोरोनाचा असो किंवा नसो उपचार देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांनी त्यांच्या मनातील भीती काढून प्रत्येक रुग्णांना उपचार देण्याची विनंती यावेळेस त्यांनी केली.झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यातील प्रत्येक खासगी डॉक्टरांना कोविड आणि नॉन कोविड असा फरक न करता प्रत्येक रुग्णांना उपचार द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. जर कोरोनाच्या नावाखाली यापुढे इतर रुग्णांचा उपचाराभावी मृत्यू झाल्यास, अशा डॉक्टरवर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.