मुंबई - आता धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि बायोगँस निर्मिती होणार आहे. यासंबधी प्रकल्पाच्या निर्मितीसाठी जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती आदिवासी राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांनी दिली. भंडारा जिल्ह्यात 100 एकर जमिनीत धानाच्या तणसापासून इथेनॉल आणि बायोगँस निर्मितीचा प्रकल्प होणार असून, या प्रकल्पासाठी 1 हजार 500 कोटी रुपये लागणार आहेत.
भविष्यकालीन तरतूद म्हणून अधिकची जमीन मागणी करणे व उपलब्ध करून देणे याबाबत सूचना देण्यात आली आहे. एका वर्षात प्रकल्प सुरू होईल, असेही फुके म्हणाले. या प्रकल्पासाठी एमआयडीसी सर्व सहकार्य करणार आहे. यातून बायोगॅस निर्मिती होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचेही फुके म्हणाले.
परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा या प्रकल्पाद्वारे होणार आहे. भंडारा जिल्ह्याच्या विकासाला यामुळे गती मिळणार आहे. या स्वरूपाचे भारतात 12 प्रकल्प उभारण्यात येत असून, त्यापैकी 4 प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. या प्रकल्पास जनावरांचा चारा वगळून मोठ्या प्रमाणात तणस उपलब्ध आहे. 3.84 लाख टन तनस भंडारा जिल्ह्यात तर गोंदिया जिल्ह्यात 3.46 लाख टन तनस उपलब्ध आहे. हे सर्व तणस जाळले जात असून, आता त्यापासून इथेनॉल व गॅसची निर्मिती होणार आहे. या प्रकल्पासाठी अत्याधुनिक असे तंत्रज्ञान भारत पेट्रोलियम उपलब्ध करून देणार आहे. तणसाची बांधणी करणे मशीनच्या सहाय्याने प्रेस करून बेल्स बनवणे यासारखे आनुषंगिक उद्योगसुद्धा उभे राहणार आहेत. यामुळे १० हजार रोजगारात भर पडणार असल्याचे डॉ. फुके म्हणाले.