भंडारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यातील २०० कोटीच्या विविध विकास कामाचे आज भूमिपूजन करण्यात आले. या वेळी बोलताना ते म्हणाले की ज्या गतीने राज्यात कामे होत आहेत, ते पहाता विरोधकांच्या पोटात पोटसूळ उठले आहे. सरकार पडणार असल्याचा वावळ्या उठविणाऱ्या विरोधकांना हा विकास पहावला जात नाही. ही भितीच त्यांना विचलित करीत आहे. मात्र टिकाकारांना टिका करू द्या, आम्ही कामाने त्याला उत्तर देऊ, असा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी विरोधकांना टोला लगावला. यावेळी त्यांनी जिल्ह्याची क्षमता ओळखून जे-जे करता येईल, त्यासाठी सरकार भंडारा जिल्ह्याचा पाठीशी असल्याचे जाहिरपणे सांगितले.
राज्यात शिवशाहीचे सरकार - उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात झालेले परिवर्तन यामुळे शिवशाहीचे सरकार खऱ्या अर्थाने आले आहे. लोकांच्या मनात होते, ते आता साकार झाले. सर्वसामान्यांची कामे करणारे सरकार हे आहे. जो विकास खुंटला होता. त्याला चालना देण्याचे काम आम्ही करू. भंडारा जिल्ह्यात प्रचंड क्षमता आहे. गोसेखुर्द धरणावरील पर्यटन प्रकल्प अद्भूत आहेत. त्या माध्यमातून रोजगार देण्याचा प्रयत्न आमचा राहील. एमआयडीसी परिसरात उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करू, असेही ते म्हणाले. गोड्या पाण्यातील मासेमारीला सरकार प्राधान्य देईल. जिल्ह्यातील कोणत्याही प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही. धानाचा बोनससाठी उपसमिती गठित करण्यात आली असून त्यामाध्यमातून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. सरकार आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून जिल्ह्याचा विकासासाठी सर्वोतोपरी देणार असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 116 कोटी रूपयांच्या कामाचे भूमिपूजन - शहरात नाशिक नगर येथे अनुसूचित जाती उपयोजना अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 1.39 कोटी रुपये खर्च करून ई-लायब्ररी आणि मेडीटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. तर शहीद स्मारक येथे अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत 3.60 कोटींच्या कामाला मान्यता देण्यात आली आहे. नगर परिषद गांधी विद्यालय येथे वैशिष्टपूर्ण योजनेंतर्गत 1.07 कोटीच्या अभ्यासिकेचे बांधकाम व जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 3.50 कोटींच्या कामाला मान्यता देण्यात आली. खांबतलाव नगर परिषद येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पाच कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत तीन कोटी तर विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत एक कोटींच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे उद्घाटन आणि नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर योजनेंतर्गत भुयारी गटारी योजनेतील कामासाठी 167 कोटी मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यातील 116 कोटींच्या कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले.
15 कोटी रूपयांची शासनाकडे मागणी - बेरोजगार लोकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत, यामुळे जिल्ह्यात उद्योगांची उभारणी करावी, अशी मागणी आ. परिणय फुके यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना भंडारा जिल्हाला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. आपल्या माध्यमातूनही ही विकासाची गती अशीच प्रवाहीत होत राहील, अशी अपेक्षा आहे. नगर परिषदेसाठी प्रशस्त इमारत व्हावी, म्हणून 5 कोटींचा निधी मंजूर करावा, भंडारा शहराचा नदी काठावर सौदर्यींकरणासाठी 15 कोटी रुपये शासनाने द्यावे, पांगोळी नदीच्या विकासासाठी निधी द्यावा, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी त्यांच्या भाषणातून केली. आमदार नरेंद्र भोंडेेकर यांनी अडचणींच्या वेळी धावून येणारा नेता म्हणजे मुख्यमंत्री शिंदे आहे, असे सांगून जो आपल्या सुखःदुखात नेहमी उभा आहे, त्याचा पाठीशी आम्ही आहो, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांचा नेतृत्वात नवा भंडारा उभा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जाहीर सभेचे आयोजन - भंडारा शहरातील दोनशे कोटींहून अधिक विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा येथे आले होते. यावेळी त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. जाहिर सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सभास्थळी शहरातील भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी व्यासपिठावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खा. सुनील मेंढे, खा. कृपाल तुमाने, आ. नरेेंद्र भोंडेकर, आ. आशिष जयस्वाल, आ. परिणय फुके, आ. विजय रहांगडाले, आ. किशोर जोरगेवार, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी विकासाची गरुडझेप आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केलेल्या विकासकामांच्या आढावा घेणाऱ्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.