भंडारा - चाळीस दिवसांपूर्वी हरवलेल्या एका शाळकरी मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. साकोली पोलीस स्टेशनअंतर्गत हा प्रकार घडला. मृतदेह मिळाल्यानंतर कुटुंबाने हा मृतदेह त्यांच्या मुलीचा नसल्याचे सुरुवातीला सांगितले. त्यामुळे पोलिसांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, रात्री कुटुंबाने हा मृतदेह त्यांच्या मुलीचा असल्याचे सांगितले. या मुलीची हत्या झाली की तिने आत्महत्या केली, याचा शोध पोलीस घेत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - भाजप सरकारकडून उद्धव ठाकरे, पवार, राऊतांचे फोन टॅप? गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
साकोली येथे दहावीत शिकत असणारी ही मुलगी 40 दिवसांपूर्वी सायकलने घरून शाळेत जाते असे सांगून गेली. मात्र, त्यानंतर ती घरी परतलीच नाही. आई-वडिलांनी सुरुवातीला शोध घेतल्यानंतर साकोली पोलीस स्टेशनमध्ये तिच्या हरवल्याची तक्रार नोंदवली. या हरवलेल्या मुलीचा शोध साकोली पोलिसांनी घेतला. मात्र, तब्बल 40 दिवसानंतर मुलीचा थांगपत्ता लागला नाही.
गुरुवारी साकोली येथील वन विभागाच्या नर्सरीत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला. या मृतदेहाजवळ स्कूल बॅग, शाळेचा गणवेश, पुस्तके आढळली. तसेच मृतदेहाजवळ चप्पल आणि हातात असलेली घड्याळ यावरून सदर मुलगी ही बेपत्ता झालेली मुलगी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. परंतु, पालकांनी हा मृतदेह आपल्या मुलीचा नसल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांसमोर संभ्रम निर्माण झाला होता की हा मृतदेह नेमका कोणाचा, त्यामुळे या मृतदेहाची डीएनए चाचणी करण्याचे पोलिसांनी ठरवले होते.
दरम्यान, रात्री उशिरा कुटुंबाने मुलीच्या अंगावरील कपडे, तिच्याजवळच्या सर्व साहित्य यावरून ही मुलगी आमची असल्याचे सांगितले.
वनविभागाच्या नर्सरीत या मुलीची हत्या करण्यात आली, की तिने आत्महत्या केली, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे्. मुलगी शाळेत जाते म्हणून घरून निघाली, तेव्हा तिने वाटेतच तिच्या मैत्रिणीच्या घरी शाळेचा ड्रेस बदलून दुसरे कपडे परिधान केले. त्यानंतर ती सायकलने तिथून निघून गेली, अशी माहिती तपासात पुढे आली आहे. यानंतर ही मुलगी कुठे गेली, त्यानंतर काय झाले, याचा तपास पोलीस करत आहेत.