भंडारा - जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक झालेला आहे. मंगळवारी भंडारा जिल्ह्यांमध्ये 70 कोरोना रुग्ण आढळले होते. बुधवारी ही संख्या दुप्पट होऊन 149 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी आता सतर्क राहण्याची वेळ आलेली आहे. प्रशासनातर्फे जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीसाठी नवीन कॅम्प सुरू करण्यात आले आहेत.
जास्तीत जास्त लोकांची टेस्ट करून कोरोना रूग्णांना शोधून काढण्याचा प्रयत्न प्रशासनातर्फे केले जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या नागपूर वरून भंडारा जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि शासकीय लोकांची संख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे.
10 मार्चला होते केवळ 37 रुग्ण-
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांचा उद्रेक सुरू होता. विशेषता विदर्भामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढत होत होती. नागपूर जिल्हा तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना रुग्ण आढळत होते. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. मात्र 10 मार्च नंतर ही संख्या हळूहळू वाढायला लागली. 16 मार्चला जिल्ह्यामध्ये 70 कोरनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 17 मार्चला ही संख्या दुप्पट होऊन 149 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.
भंडारा तालुक्यातील सर्वाधिक रुग्ण-
भंडारा जिल्ह्यात आढळलेल्या 149 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे भंडारा तालुक्यातील आहेत. भंडारा तालुक्यात 81, तुमसर तालुक्यातील 22, पवनी 26, मोहाडी 12, साकोली 7, लाखणी 1 आणि लाखांदूर शून्य रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14631 झाली असून 701 क्रियाशील रुग्ण आहेत. जिल्ह्यात आज 38 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 13 हजार 601 झाली आहे. आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर आतापर्यंत एकूण 329 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.95 टक्के तर जिल्ह्याचा मृत्यूदर 02. 25 टक्के एवढा आहे.
आरटीपीसीआर चाचणीवर प्रशासनाचा भर-
कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यामुळे भंडारा जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी नव्याने आरटीपीसीआर तपासणी केंद्र सुरू केले आहे. भंडारा शहरात आज चार नवीन ठिकाणी आरटीपीसीआर चाचणी केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. यामुळे कमी दिवसात जास्तीत जास्त कोरोना रुग्ण शोधून काढण्यात यश मिळेल आणि कोरोनाचा होणारा उद्रेक थांबविता येईन, असे प्रशासनाने सांगितले आहे.
नागपूर भंडाराच्या सीमेवर असल्याने सर्वात जास्त धोका-
महाराष्ट्रात सर्वात जास्त कोरोना रुग्ण हे नागपूर जिल्ह्यात आढळून येत आहेत. बुधवारी नागपूरमध्ये 2600 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यातच नागपूर- भंडारा प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या अतिशय जास्त आहे. यामध्ये अप-डाऊन करणाऱ्या शासकीय अधिकार्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या जिल्ह्यात नागपूर वरून अपडाऊन करणारे बरेच अधिकारी हे पॉझिटिव आलेले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यातच भंडारा शहरातील एका शाळेच्या शिक्षकांना ही कोरोना झाल्यामुळे कोरोनाचा आता शाळेमध्ये शिरकाव झाला आहे.
नियम पाळा लॉकडाऊन टाळा-
कोरोनाचा हा उद्रेक थांबवायचं असेल तर नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. घरून निघतांना मास्क घालावा, सॅनिटायझरचा उपयोग करावा आणि गर्दीचे ठिकाण टाळावे, या नियमांचे पालन करुन कोरोनाचा उद्रेक थांबविता येऊ शकते. अन्यथा ज्या पद्धतीने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. ते बघता भविष्यात भंडारा जिल्ह्यातही लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
हेही वाचा- सचिन वाझेंना ऑपरेट करणाऱ्यांना शोधणे गरजेचे - देवेंद्र फडणवीस