भंडारा - मुंबईवरून 20 मे रोजी अड्याळ येथे आलेले 29 वर्षीय आणि 22 वर्षीय दोन तरुणांना सिंदपुरी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. 29 मे रोजी या दोघांचेही घशाची नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठवले असता ३० तारखेला दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे या दोघांनाही कोणतेही लक्षण नव्हते. 31 वर्षीय तिसरा रुग्ण हा पुणे येथून लाखांदूरला आला होता, त्याला क्वारंटाईन केले गेले होते. त्याला सौम्य ताप असल्याने 29 तारखेला त्याच्या घश्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. 30 तारखेला त्याचाही अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सतत वाढत आहेत. विशेष म्हणजे यातील पोलीस विभागातील दोन लोक सोडल्यास इतर सर्व नागरिक हे मुंबई पुणे वरून आलेले आहेत. मागील 20 दिवसात पुणे, मुंबई वरून 12,000 लोक भंडारामध्ये आले आहेत. मागील 2 महिन्यात पुणे, मुंबई आणि इतर राज्यातून 39, 191 नागरिक जिल्ह्यात आले आहेत. अजूनही लोकांचा परत येण्याचा ओघ सतत सुरू असल्याने यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित लोकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. 29 मे रोजी 39 घश्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले. यापैकी 30 तारखेला 3 अहवाल पॉझिटिव्ह आले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 29 आहे. यापैकी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून 28 लोकांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण 1691 स्वॅब तपासणीसाठी पाठविले असून 1569 निगेटिव्ह आले, तर 93 अहवाल अजूनही अप्राप्त आहेत.