भंडारा - 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी भाजपला पुन्हा एकदा प्रचंड बहुमतांनी निवडून दिल्यानंतर नागरिकांना अपेक्षा होती की, पेट्रोल, डिझेलच्या दरासहीत महागाई कमी होईल. मात्र; नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच रूपयांनी वाढले आहेत. यावर सामान्यांच्या संतप्त प्रतिक्रीया उमटत असून दर कमी करण्याची मागणी केली जात आहे.
भाजपला आम्ही पुन्हा सत्तेत आणले ते लोकांची सेवा करण्यासाठी मात्र, त्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याऐवजी उलट दर वाढवल्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला फटका बसला आहे. या निर्णयामुळे आमचे बजेट कोलमडून पडेल, तेलाचे दर वाढल्यामुळे इतरही वस्तूंचे दर वाढतील त्यामुळे महागाई पुन्हा वाढेल. तसेच सध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र डिझेलचे दर वाढल्यामुळे शेतीकामात वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरची रोजंदारी वाढणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत.
'हा निर्णय आमच्यासाठी खुप त्रासदायक आहे. दिवसभर काम करून कुठं संध्याकाळच्या भाकरीची सोय होते.' अशा प्रतिक्रिया 200-300 रोजंदारीने काम करून घर चालवणाऱया कामगारांनी दिल्या.