भंडारा - रेड झोन पुण्यावरून आलेल्या वयोवृद्ध पती- पत्नी यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे भंडारा जिल्हा पुन्हा ग्रीन झोनमधून ऑरेंजमध्ये आला. पती-पत्नीला पुणेवरून खासगी गाडीतून घेऊन येणाऱ्या चालकाला त्याच्या परिवारासह क्वारंटाइन केले गेले आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या 29 लोकांनाही क्वारंटाइन केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले असून एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हयात दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी दिली.
दोन्ही रुग्णांमध्ये मध्ये 58 वर्षीय महिला असून 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हे पती-पत्नी पुणे येथून गुरुवारी भंडारामध्ये आले होते. त्यानंतर 15 तारखेला त्यांना क्वारंटाइन केले आणि तात्काळ त्याच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आहे.
पुणे येथील व्यक्ती असल्यामुळे व भंडारा येथे येताच लगेच त्यांची वैद्यकीय तपासणी रुग्णालयात करण्यात आल्यामुळे ते राहत असलेले क्षेत्र कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आलेले नाही. ज्या खासगी गाडीने ते आले होते त्या चाकाला त्याच्या परिवारासह क्वारंटाइन केले गेले आहे. तसेच 29 अतिधोकादायक संपर्कातील लोकांना क्वारंटाइन केले गेले असून या सर्वांचे घश्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका असल्याने राष्ट्रीय महामार्गावर कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना तात्काळ संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येत आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गावोगावी गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. सध्या व्यवसाय जसे सुरू आहेत तसेच सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, मास्क वापरावे, सॅनिटाइझर वापरावे. ज्या लोकांना होम क्वारंटाइन केले जाते त्या सर्वांनी त्यांचे पालन करावे आणि घरीच राहावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील ज्या लोकांना होम क्वारंटाइन केले गेले होते त्यांचे 14 दिवसाचे होम क्वारंटाइन संपल्याचे त्यांनी या वेळेस सांगितले.