भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयात 8 जानेवारी रोजी मध्यरात्री आग लागील होती. या आगीतून बचावलेल्या 7 बालकांपैकी एका बाळाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील मृतक बालकांची संख्या 11 वर गेली आहे. या घटनेनंतर आमच्या बालकांचा सुरवातीला व्यवस्थित उपचार झाला. नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा मृत्यू झाल्या, असा आरोप पालकांनी केला आहे. तर शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्याच्या कोका येथे राहणाऱ्या मनोज आणि सानू मारबते यांना मागच्या वर्षी तब्बल दहा वर्षांनी बाळ झाले होते. यापैकी एक बाळ नऊ दिवसांनी मरण पावला, तर दुसऱ्या बाळाचा उपचार जिल्हा सामान्य रुग्णालय येथील बेबी केअर युनिटमध्ये सुरू होता. 8 जानेवारीला बेबी केअर युनिटमध्ये आग लागल्याने दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर 7 बालकांना वाचविण्यात यश आले होते. या सात बालकांपैकी एक बालक हा सानू मारबते यांचा होता.
प्रकृती खालावल्याने नागपूरला उपचारासाठी रवाना -
ज्या 7 बालकांना सुखरूप वाचविण्यात आले. त्यातील अन्य बालकांची प्रकृतीत सुधार झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले होते. मात्र, मारबते दांपत्यांच्या चिमुकल्याची प्रकृती अस्वस्थ होती. त्याच्यावर भंडारा येथील शिशु केअरमध्ये उपचार सुरू होते. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला घटनेनंतर 16 जानेवारीला नागपूर येथील शासकीय बैद्यकीय महाविद्याल्यात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. मात्र, बाळाच्या हृदयात कार्बन गेल्याने त्याल श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यामुळे डोळ्यातून सतत पाणी वाहत असल्याने तो झोपत नव्हता, असे पालकांनी सांगितले.
प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगून घरी पाठविले -
पंधरा दिवस नागपूरच्या रुग्णालयात उपचार केल्यानंतर प्रकृतित सुधारणा झाल्याचे सांगून नागपूर येथील डॉक्टरांनी त्याला 1 फेब्रूवारी रोजी घरी पाठवले. मात्र, घरी आल्यानंतर चार दिवस बाळ रात्रभर झोपला नाही व सतत रडत होता, अशी माहिती मारबते दाम्पत्यांनी कोका उपकेंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्याना दिली होती. पाच तारखेला सायंकाळच्या सुमारास या मुलाची घरीच हालचाल बंद झाली. त्याला तातडीने भंहारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करून मूतदेह पालकांच्या सुपूर्द करण्यात आला.
मृत्यूचे कारण अस्पष्ट -
या बालकांच्या मृत्यूविषयी जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारले असता शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या बालकाचा मृत्यू नेमका कशाने झाला, हे पुढे येईल आणि त्यानंतरच इतर निर्णय घेतले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - टिकैत यांचा केंद्राला अल्टीमेटम; महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत आंदोलन सुरूच राहणार