भंडारा - जिल्ह्याच्या साकोली नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा रौद्र रूप पाहायला मिळाला. अतिक्रमण काढायला अतिक्रमणधारकाने मनाई केल्याने मुख्याधिकारी यांनी स्वतः हातात हातोडा घेऊन अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर अतिक्रमणधारक आणि मुख्याधिकार्यांमध्ये प्रचंड वादंग होऊन परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तेवढ्यात माजी आमदार बाळा काशिवार हे घटनास्थळी आल्याने आणि मध्यस्थ्याची भूमिका बजावल्याने हा वाद बऱ्याच वेळनंतर शांत झाला.
हेही वाचा - विद्यादानाचे हात सरसावले कोविड रुग्णांच्या मदतीला, साद माणुसकीची समूह लाखनीचा उपक्रम
मुख्याधिकारी यांच्या कामाची पद्धत नेहमीच चर्चेचा विषय
कधीकाळी आपल्या उत्कृष्ट कामासाठी ओळखल्या जात असलेल्या माधुरी मडावी या साकोलीच्या मुख्याधिकारी झाल्यापासून या न त्या कारणाने चर्चेत होत्या. काही महिन्यांपूर्वी त्यांचे स्थानांतरण झाले होते. दरम्यान, मॅटमध्ये जाऊन त्यांनी प्रक्रियेवर स्थगनादेश मिळवला आहे. आठवढ्यापूर्वीच त्या साकोली येथे मुख्याधिकारी म्हणून पुन्हा रुजू झाल्या. 19 मे रोजी त्यांनी नगरसेविका अनिता हरीश पोगडे यांना त्यांनी केलेले अतिक्रमण 24 तासांत काढण्यासंदर्भात नोटीस बजावली. अतिक्रमण न काढल्यास यंत्राद्वारे काढण्यात येईल, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. दरम्यान, आज पंधरा ते वीस जणांचा ताफा घेऊन मुख्याधिकारी पोगडे यांच्या घरी पोहचल्या. मात्र, अतिक्रमण तोडण्यास विरोध सुरू झाला. अतिक्रमण तोडूदस्ता नागरिकांच्या भीतीमुळे पुढे येत नोव्हत, तेव्हा मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी स्वतः मोठा हातोडा (घन) हातात घेत अतिक्रमण तोडण्यास सुरुवात केली. एका मुख्य अधिकाऱ्याकडून स्वतःहून अतिक्रमण काढण्याचा प्रकार पाहून तेथे जमलेल्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केला. काही त्यांची खिल्ली उडवत साकोलीमध्ये पहिलवान आला असे म्हणून हसत होते.
नगराध्यक्ष आणि विरोध करणाऱ्या लोकांशी शाब्दिक वाद
मुख्याधिकारी त्यांच्या अतिक्रमण तोडूदस्त्यासह जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन अतिक्रमण तोडण्यास पोहचल्यावर साकोलीच्या नगराध्यक्ष धनवंता राऊत, भाजपचे कार्यकर्ते डॉक्टर अजय तुमसरे, काही नगरसेविका आणि पोगडे यांच्या कुटुंबीयांशी त्यांचे शाब्दिक भांडण सुरू झाले. शाब्दिक भांडणांमध्ये मुख्याधिकारी यांचे रौद्र रूप पाहायला मिळाले.
अतिक्रमण तोडताना पोलीस बंदोबस्त का घेतला नाही
एरवी कोणतेही अतिक्रमण तोडण्यासाठी जाताना पोलीस बंदोबस्त घेतले जाते, मात्र मुख्याधिकारी यांनी नेमकी हीच चूक केली आणि स्वतः त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत अतिक्रमण तोडण्यासाठी गेल्या आणि त्यानंतर जे घडले ते या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. नागरिक आणि अधिकारी यांच्यातला हा वाद साकोलीमध्ये चर्चेचा विषय आहे.
पहिले इतरांचे अतिक्रमण काढा नंतर आमचा, असा अजब बचाव
साकोलीमध्येही बऱ्याच लोकांचे बांधकाम अतिक्रमणात असल्याने कारवाई करायची असेल तर सर्वांवर करा, अशी भूमिका घेत अतिक्रमण पाडण्यास पोगडे यांच्याकडून विरोध झाला. तर, ज्याचे अतिक्रमण काढण्यासाठी त्या गेल्या होत्या, त्या हरीश पोगडे यांनी हेतुपुरस्सर ही कारवाई केली जात असल्याचे सांगितले. इतरही अनेकांचे अतिक्रमण आहे, मात्र फक्त मलाच नोटीस का दिली गेली. केवळ राजकीय सूडबुद्धीतून हा प्रकार होत असून कोरोनाच्या काळात अतिक्रमण काढणे योग्य आहे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कोरोनाच्या नियमांचे पालन नाही
अतिक्रमण काढण्याचा हा गोंधळ आणि तेथे झालेली वादावादी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. कोरोनाच्या काळात झालेली गर्दी कितपत सुसंगत आहे, हाही प्रश्नच आहे. अतिक्रमण काढण्यासाठी कोरोनाची अडचण आहे, नाही, हा वादाचा विषय असला तरी, ही कारवाई करण्यासाठी जर गर्दी होत असेल, कर्मचाऱ्यांचा समूह होत असेल, तर सध्या प्रशासनाकडून टाकण्यात आलेल्या निर्बंधांची पायमल्ली नाही का? या गर्दीतून जर कोरोनाची लागण झाल्यास त्यास जबाबदार कोण? हा प्रश्नही तेवढाच महत्वाचा आहे. शहरात अनेकांची अतिक्रमणे असताना हेच अतिक्रमण एवढ्या घाईने काढण्याची गरज का वाटावी? हेही महत्वाचे.
आमदारांच्या मध्यस्थीनंतर मंगळवारपर्यंतचा अल्टिमेटम
आक्रमक अधिकारी आणि नागरिक यांच्यातील वाद शमवण्यासाठी माजी आमदार बाळा कशी यांनी मध्यस्थीची भूमिका निभावली, त्यानंतर मुख्याधिकारी यांनी अतिक्रमण धारक पोगडे यांना मंगळवार पर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढण्यास वेळ दिला आहे. मंगळवारपर्यंत झालेले अतिक्रमण काढले गेले नाही, तर नगरपालिका स्वतःहून येऊन अतिक्रमण काढेल, असे यावेळेस मुख्याधिकारी यांनी सांगितले. या प्रकारानंतर मुख्याधिकारी मडावी यांच्याशी प्रतिक्रियेसाठी वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
हेही वाचा - वृद्ध आणि अपंगांच्या लसीकरणासाठी बाप्पा आले धावून