मुंबई/छत्रपती संभाजीनगर BRS Win In Gram Panchayat Poll : राज्यात नुकताच ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत तेलंगाणातील भारत राष्ट्र समितीनं जोरदार मुसंडी मारुन आपलं खातं उघडलं आहे. बीआरएसनं विदर्भातील अनेक ग्राम पंचायतीवर झेंडा फडकावून गुलाबी वादळ निर्माण केलं आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यात बीआरएसनं 19 ग्राम पंचायतीवर झेंडा फडकावल्याचा दावा माजी आमदार तथा बीआरएसचे नेते चरण वाघमारेंनी केला आहे. तर नांदेडमध्येही गुलाबी वादळ आल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारत राष्ट्र समितीनं भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोन्ही गटाला मोठं आव्हान देणार असल्याचं स्पष्ट केलं.
भंडाऱ्यात तब्बल 11 ग्रामपंचायतीवर कब्जा : भंडारा जिल्ह्याच्या 66 ग्राम पंचायतीचा सोमवारी निकाल लागला आहे. पहिल्यांदाचं या निवडणुकीत बीआरएसनं आपले उमेदवार उभे केले होते. यातील तब्बल 11 ग्राम पंचायतीवर बीआरएसनं कब्जा केला आहे. बीआरएसनं केवळ खातचं उघडलं नाही, तर सत्ताधारी भाजपाच्या गोटात धडकी भरवली आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांच्याच जिल्ह्यात काँग्रेसला मागं टाकत आगामी निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याची चेतावणी दिली आहे.
बीआरएसचे 50 उमेदवार होते रिंगणात : भंडारा जिल्ह्यात 66 ग्राम पंचायतीसाठी निवडणुका होणार होत्या. मात्र त्यापैकी दोन जागेवर बिनविरोध निवडणूक झाली. त्यामुळे उर्वरित जागेसाठी मतदान झालं. यामध्ये मोहाडी तालुक्यात सर्वाधिक 57 ग्रामपंचायत होत्या. या निवडणुकीत पहिल्यांदाच बीआरएसकडून 50 उमेदवार रिंगणात होते. यापैकी 19 ठिकाणी बीआरएसचे सरपंच पदाचे उमेदवार निवडून आल्याचा दावा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं बाजी मारली असून त्यांचे 25 सरपंच निवडून आले आहेत. त्यांच्या खालोखाल भाजपाचे 10 आणि काँग्रेसनं नऊ जागेवर विजय मिळविला आहे. तर शिंदे गट आणि ठाकरे गटांना खातंही उघडता आलं नाही.
राजकीय पक्षांमध्ये भरली धडकी : तुमसर मोहाडी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी बीआरएसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर विदर्भाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांच्यावर विश्वास करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला. यामध्ये सर्वाधिक भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी होते. या क्षेत्रामध्ये चरण वाघमारे यांची चांगलीच पकड आहे. त्यामुळे बीआरएसचे काही उमेदवार नक्कीच निवडणुकीत निवडून येतील, अशी अपेक्षा होती. मात्र जो निकाल आला, त्यामुळे इतर राजकीय पक्षांमध्ये चांगलीच धडकी भरलेली आहे. विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकीत आणि लोकसभा निवडणुकीमध्ये बीआरएस पक्ष वर्चस्व दाखवेल, अशी शक्यता माजी आमदार चरण वाघमारे यांनी वर्तवली आहे.
भाजपाला मिळालं नाही अपेक्षित यश : तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू कारेमारे हे आमदार आहेत. त्यांनीही त्यांचं वर्चस्व राखत राष्ट्रवादीचे तब्बल 21 सरपंच निवडून आणले आहेत. मात्र भाजपाला अपेक्षित यश मिळालं नाही. सध्या महाराष्ट्रात आणि केंद्रामध्ये भाजपाची सत्ता आहे. भंडारा जिल्ह्याचे खासदारही भाजपाचे आहेत. सध्या भाजपाची राष्ट्रवादीशी युती ही आहे. त्यामुळे या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजपा चांगली कामगिरी बजावून मोठ्या प्रमाणात सरपंच निवडून येतील, अशी अपेक्षा होती. मात्र केवळ दहा सरपंच त्यांना निवडून आणता आले. त्यामुळे भारत राष्ट्र समिती आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपापुढं मोठं आव्हान उभं करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना आव्हान : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा भंडारा हा जिल्हा आहे. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातच काँग्रेसला भारत राष्ट्र समितीनं आव्हान दिलं आहे. काँग्रेसला केवळ 9 जागेवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बीआरएसनं भाजपा, काँग्रेस, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गट आणि राष्ट्रवादीलाही आव्हान दिलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.
शिंदे आणि ठाकरे गट शून्यावर : शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे भंडारा-पवनी विधानसभा क्षेत्रातील आमदार आहेत. मात्र तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये त्यांचा प्रभाव अजिबात नसल्याचं या निवडणुकीत स्पष्ट झालं. शिंदे गटाचा एकही सरपंच या निवडणुकीत निवडून आलेला नाही. तसेच ठाकरे गटाचा एकही सरपंच या निवडणुकीत निवडून आलेला नाही. भारत राष्ट्र समितीमुळे शिंदे आणि ठाकरे गटाचा सुपडासाफ झाला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या या दोन्ही गटालाही मोठं आव्हान भारत राष्ट्र समितीनं उभं केलं आहे.
नांदेडमध्ये बीआरएसनं उधळला गुलाल : गोगला गोविंद तांडा इथ बीआरएस पक्षानं आपला झेंडा फडकावला आहे. सरपंचासह सात पैकी चार जागांवर बीआरएसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तालुक्यातील तीन ग्राम पंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. त्यात दगडफेकीनं नावारूपास आलेल्या गोगला गोविंद तांडा ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत भारत राष्ट्र समितीनं विजय मिळवला. मरतोळी ग्रामपंचायत भाजपकडं तर अंबुलगा ग्रामपंचायत काँग्रेस पक्षाकडं गेली. गोगला गोविंद तांडा इथं बीआरएस पक्षाचे प्रमुख रामराव चव्हाण यांचं पॅनल होतं. सरपंच पदासह सात ग्रामपंचायत सदस्य बीआरएस पक्षाचे विजयी झाल्यानं तालुक्यात बीआरएस पक्षानं मोठी मुसंडी मारली. पहिल्यांदाच बीआरएस पक्षानं ही ग्रामपंचायत ताब्यात घेतली. सरपंच पदाचे उमेदवार अमोल श्रीरंग चव्हाण यांना 511 मतं तर शिवानी पांडुरंग जाधव यांना 346 मतं मिळाली.
बीआरएसचे विजयी सदस्य : गोगला गोविंद तांडा ग्रामपंचायतीचे विजयी सदस्य अनशाबाई गोविंद आडे, शांताबाई शिवाजी राठोड, विनय मारोती चव्हाण, तुळसाबाई शंकर चव्हाण, रामराव वसराम चव्हाण, मोतीराम ठाकर चव्हाण
जिल्ह्यातील एकूण निकाल - 64
भाजप – 10
शिंदे गट –0
ठाकरे गट –0
अजित पवार गट – 23
शरद पवार गट – 03
काँग्रेस – 9
बीआरएस - 19
इतर - 0
हेही वाचा :