भंडारा - कोरोनाचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने नियमावली जरी केली आहे. मात्र, केंद्राच्या या नियमावलीला भाजपचे भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी केराची टोपली दाखविली आहे. त्यांनी मुद्दामपणे नियम मोडून शुक्रवारी रात्री अकरा वाजता सलून दुकान उघडायला लावून दाढी-कटींग केल्याचा प्रकार समोर आला आहे.
खासदार सुनील मेंढे यांनी लॉकडाऊनचे नियम मोडले. असे करत असताना नागरिकांनी त्यांचे व्हिडिओ चित्रिकरण केले. तसेच ते सोशल मीडियावर व्हायरल केले. भंडारा पोलीस स्टेशनमध्ये त्यांची लेखी तक्रार देऊन खासदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शुक्रवारी रात्री 11 नंतर भंडारा शहरातील राजीव गांधी चौकातील लुक्स सलूनचे शटर उघडे दिसले. तसेच त्यावेळी खासदार सुनील मेंढे यांची गाडी आणि त्यांचा गार्ड हे दुकानाबाहेर उभे असल्याचे दिसले. मात्र कोरोना काळात रात्री उशिरा दुकान उघडे असल्याचे दिसल्यामुळे तिथून जाणाऱ्या नागरिकांनी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेंढे यांच्या सुरक्षा रक्षकाने त्यांना रोखले. यावेळी नागरिकांनी त्या सुरक्षा रक्षकालाच अनेक प्रश्न विचारत भांबावून टाकले. मात्र या नियमाचे उल्लंघन करण्याच्या प्रकाराबाबत साहेबांनाच विचारा असे उत्तर सुरक्षा रक्षकाने दिले.
दरम्यान, बाहेरून कुणीतरी आपला व्हिडिओ काढत आहे, असं सुनील मेंढे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःला लपविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर व्हिडिओ काढणे बंद आहे, असं लक्षात येताच झपाट्याने दुकानाबाहेर पळत येऊन गाडीत बसून घटनास्थळावरून पळ काढला.
या सर्व प्रकाराने चिडलेल्या संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत खासदार सुनील मेंढे आणि दुकानदार याच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
नगराध्यक्ष हा शहराचा प्रमुख व्यक्ती असतो जर प्रमुख व्यक्ती तशा पद्धतीने मुद्दाम केंद्राच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असेल तर अशा व्यक्तींवर नक्कीच कारवाई केली जावी तसेच नैतिकतेच्या आधारावर या नगराध्यक्ष आणि त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी संतप्त नागरिकांनी केली आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरुना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येला नियंत्रणात आणण्यासाठी याच नगराध्यक्षांनी मुख्याधिकारी भंडारा यांच्यासह निर्णय घेत शनिवार आणि रविवार असे दोन दिवस भंडारा शहरात जनता कर्फ्यू घोषित केले आहे. तसेच दररोज सहानंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या लोकांवर कायदेशीर आणि दंडात्मक कार्यवाही नगरपालिकेच्या मार्फत केली जाते.
एकीकडे जनतेसाठी नगराध्यक्षांनी वेगळे नियम ठेवलेले आहेत तर दुसरीकडे स्वतःसाठी वेगळे नियम ठेवले आहेत का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. कायदे मोडणाऱ्यांनावर कायदेशीर कार्यवाही करा म्हणून रात्रीच भंडारा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी सध्या तक्रार चौकशी साठी ठेवली असून मुख्याधिकारी किंवा नगरपालिकेचे अधिकारी जर तक्रार देतील त्यानुसार आम्ही कायदेशीर कारवाई करू असे पोलिसांनी सांगितले आहे. खासदार सुनील मेंढे यांच्यावर खरंच कायदेशीर कारवाई होते का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.