भंडारा - लॉकडाऊन काळात आलेले वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे, या मागणीला घेऊन भंडारा जिल्ह्यातही काही ठिकाणी भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. तसेच हमीभावाने धान खरेदीसाठी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी मोहाडी-तुमसर विधानसभाचे भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात तुमसर-रामटेक रोडवरील कांद्रीयेथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो भाजपा कार्यकर्त्यांसह विकास फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही लावण्यात आला होता.
कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बुडाले. जनता आर्थिक संकटात सापडली आहे. अशा परिस्थितीत आलेले वाढीव वीज बिल भरने शक्य नसल्याने लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करावे, ही मागणी विरोधकांकडून सतत केली जात आहे. सुरुवातीला महाराष्ट्र शासनानेही सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र नुकताच ऊर्जा मंत्रांनी बीज बिल माफ करता येणार नसल्याचे सांगत घुमजाव केले. त्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत असताना विरोधकांनीही आवाज उठवला आहे. वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणीसाठी आंदोलकांनी यावेळी वीज बिलांची होळी केली.
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात वाढीव वीज बिल कमी करण्याच्या मागणीसाठी जाळून आंदोलन करण्यात आले वीज बिल माफ करावे, अशी आंदोलनकर्त्यांनी घोषणा केली. मात्र हे आंदोलन करताना भाजपाचे कार्यकर्ते फारसे उत्साही दिसले नाहीत. केवळ वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करण्यासाठी म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचे आंदोलन केल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून आले. एवढेच नाही तर आंदोलन होणार आहे. याविषयी साधी माहितीही माध्यमांना दिली गेली नव्हती. त्यामुळे केवळ देखाव्यासाठी भंडारा जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला.
वीजबिलासह केंद्र सुरू करण्यासाठी झाले आंदोलन-
तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी भाजपा आणि त्यांच्या विकास फाउंडेशनच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधार भूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणीही यावेळी केली. यावेळी आंदोलनाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. वीजबील संदर्भात ऊर्जामंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी प्रत्येकांनी वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे भाष्य करून हे त्रिकुट सरकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले, अशी टीका चरण वाघमारे यांनी केली. तसेच या क्षेत्रातले धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास आणि वीज बिल माफ न केल्यास येत्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी शासनाला दिला.