भंडारा- शासनाने दिलेल्या आदेशांचे भंडारा शहरामध्ये काही व्यापारी पायमल्ली करत आहेत. यामुळे नियम न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुरुवारी देखील दंडात्मक कारवाई केली गेली. बुधवारी 3 दुकानदारांवर बंधन असलेल्या दिवशी दुकाने सुरू केल्यामुळे कारवाई केली गेली. गुरुवारी वेळचे बंधन न पाळणाऱ्या व्यापाऱ्यांवर नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. मात्र, ही कारवाई करत असताना व्यापाऱ्यांनी कर्मचाऱ्यांशी वाद घातला. नेत्यांच्या नावाने धमकविण्याचे प्रकार घडले.
लॉकडाऊनमध्ये व्यवसाय डबघाईस गेलेत या व्यवसायांना पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने ग्रीन झोन आणि ऑरेंज झोन मधील जिल्ह्यातील व्यवसाय सुरू केले. पण व्यवसाय सुरु करताना नागरिकांची गर्दी होऊ नये, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनातर्फे वेगवेगळ्या दुकांनासाठी दिवस ठरवून दिले. तसेच दुकान सुरू ठेवण्याची वेळ ही 11 ते 5 वाजे पर्यंत ठरवून दिली आहे. तसे पत्रक या व्यापाऱ्यांना देण्यात आले. मात्र, काहीच व्यापारी या नियमांचे पालन करीत सायंकाळी 5 वाजेला दुकाने बंद करतात. उर्वरित दुकानदार 5 नंतर ही दुकाने सुरू ठेवतात ही बाब नगर पालिकेच्या लक्षात आल्यावर कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सुट्टीच्या दिवशीही आपल्या कर्तव्याचे पालन करत कारवाई केली.
5 वाजल्यानंतर पाहिले माईक मधून दुकाने बंद करण्याचे आव्हान करण्यात आले. मात्र, एवढ्यावरही ज्या दुकानदारांनी दुकाने बंद केली नाहीत त्या दुकांदारावर कारवाई करण्यासाठी नगर पालिकेचे कर्मचारी पोलिसांना सोबत घेऊन गेले. कारवाई करण्यासाठी दुकानात पोहचताच व्यापारी वर्ग एकत्रित येत दवाब वाढवून भांडण करू लागले. ज्या एका दुकानांवर कारवाई केली गेली त्या दुकान मालकाने तर एका मोठ्या नेत्याच्या नावाने धमकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या धमक्यांना न घाबरता पाच हजारांचा दंड ठोठावला.