भंडारा - रेड झोनमध्ये असलेल्या नाशिक जिल्ह्यातून आलेल्या एका 19 वर्षीय तरुणाचा कोव्हिड अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भंडाऱ्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 वर पोहोचली आहे. यापैकी एक रुग्ण बरा झाला असून तीन रुग्णांवर आता आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
मूळचा लाखनी तालुक्यातील रहिवासी असलेला हा तरुण नाशिक जिल्ह्यात एका सोलर निर्मिती करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये कामावर होता. 13 तारखेला कोणतीही परवानगी न घेता एका ट्रकमध्ये बसून भंडाऱ्यातमध्ये पोहोचला. 14 तारखेला रात्री नऊ वाजता जिल्ह्याच्या सीमेवर या तरुणाला थांबल्यानंतर राजे दहेगाव येथील क्वारंटाईन होममध्ये त्याला ठेवण्यात आले. त्यानंतर पंधरा तारखेला त्याच्या घश्याचा नमुना तपासणीसाठी पाठविला असता सोमवारी 18 तारखेला हा तरुण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला.
दरम्यान, तरुणाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये स्वतंत्र खोलीत ठेवल्यामुळे त्याचा संपर्क इतर कोणाशीही आला नसल्याने इतर कोणी बाधित झाले असल्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे ही जिल्ह्यासाठी थोडी समाधानाची गोष्ट आहे. ज्या ट्रकमध्ये बसून हा तरुण भंडारा येथे पोहोचला त्या ट्रक चालकाशी याचा कोणताच संबंध आला नसल्याचे ट्रकचालकाने सांगितले आहे. त्यामुळे हा तरुण ज्या कंपनीमध्ये कार्यरत होता, त्या कंपनीला सुद्धा याच्याविषयी सांगण्यात आले आहे. या तरुणाला कोरोना विषाणुची लागण नेमकी कुठे झाली हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. मात्र, जिल्ह्यासाठी केवळ एकच गोष्ट समाधानाची आहे, की या तरुणामुळे जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती कोरोनाबाधित होण्याची शक्यता नाही.
पुण्यावरून आलेले दोन व्यक्ती 16 तारखेला कोरोनाबाधित असल्याचे समोर आले होते आणि 18 तारखेला अजून एक व्यक्ती कोरोनाबाधित निघाली. जिल्ह्याची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 वर पोहोचली असून एक जण कोरोनामुक्त झाला आहे, तर 3 लोकांवर उपचार सुरू आहेत.