भंडारा : या प्रकरणी भंडारा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उद्या शिक्षा सुनावणार आहेत. या बहुचर्चित सोनी हत्याकांडात प्रत्यक्षदर्शी पुरावे नसले तरी उपविभागीय अधिकारी भोयटे आणि पोलीस कर्मचारी भुजाडे यांनी केलेल्या तपासामुळे केवळ परिस्थितीजन्य पुरावे सादर करून आरोपींना दोषी सिद्ध करता आले, असे या खटल्याचे विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी सांगितले आहे.
हे आहेत आरोपी: या हत्याकांडातील ७ ही आरोपींना कलम ३०२, ३९४ सह विविध आरोपा खाली दोषी ठरविण्यात आले आहे. आरोपींमध्ये शाहनवाज ऊर्फ बाबू शेख (२२), महेश आगाशे (२६), सलीम पठाण (२४), राहुल पडोळे (२२), केसरी ढोले (२२) रा.तुमसर, सोहेल शेख (२६), रफीक शेख (४२) रा.नागपूर यांचा समावेश आहे.
उज्वल निकम यांनी मांडली बाजू : तुमसर येथील 26 फेब्रुवारी 2014 च्या रात्री दरोडा घालून 7 आरोपींनी संजय सोनी, त्यांची पत्नी पूनम सोनी आणि मुलगा ध्रुमिल सोनी यांची गळा आवळून हत्या केली होती. सोन्याचे व्यापारी असल्याने सोनी यांच्या घरातील सर्व सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने या आरोपींनी चोरून पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न केले होते. हत्यानंतर या कटाचा मास्टर माईंड सोनी यांचा वाहन चालक आणि त्याच्या सात साथीदारांना अटक करण्यात आली होती. नागरिकांनी या प्रकारांची सुनावणी जलदगती न्यायालयात करावी आणि वकील म्हणून उज्वल निकम यांची मागणी केली होती. शासनाने ही मागणी पूर्ण करीत उज्वल निकम यांना सरकारी वकील नियुक्त केले होते.
उद्या शिक्षा सुनावणार : स्वत: महाराष्ट्र सरकारचे वकील उज्वल निकम हे बाजू मांडत असल्याने दोषींवर कारवाई होईल असा विश्वास सर्वांनाच होता. अखेर या प्रकरणाचा आज निकाल लागला असून सर्व आरोपी दोषी आढळले आहेत. उद्या त्यांना कोर्टाद्वारे शिक्षा सुनावली जाणार आहे.
कसे घडले होते हत्याकांड - तुमसर शहरातील रामकृष्ण नगर येथे राहणाऱ्या संजय चिमणलाल सोनी (४७), पुनम संजय सोनी (४३), ध्रुमिल संजय सोनी (११) ह्या एकाच कुटुंबातील तिघा लोकांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संजय सोनी हे व्यवसायाने सराफा व्यावसायिक होते. त्यामुळे बरेचदा ते सोन्या-चांदीची विक्री करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात जात होते. घटनेच्या एक दिवसाअगोदर म्हणजेच २५ फेब्रुवारी २०१४ ला संजय सोनी यांनी एका चालकाला गोंदियाला जाण्यासाठी फोन केला. संजय सोनी हे गोंदियाला कशाला जातात याची कल्पना या चालकाला होती. त्यामुळे त्याने लगेच एक मोठे कारस्थान रचले. त्यानुसार त्याने नागपूर येथील सहा लोकांना यात सामील करून घेतले.
हत्येचा बनाव उघड : संजय सोनी 26 फेब्रुवारीला चालकाला घेऊन आपल्या गाडीने गोंदियाला गेले. सर्व व्यवहार आटपून नेहमीप्रमाणे त्याच रात्री ते तुमसरला परत निघाले. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात आल्यानंतर बिरसी फाट्याजवळ चालकाने लघुशंकेच्या बहाण्याने कार थांबविली. ठरल्याप्रमाणे त्याचे तीन साथीदार हे त्याला तिथे भेटले. यांना तुमसरपर्यंत जायचे आहे असे सांगून गाडीत बसविले. गाडीत बसताच या तिघांनीही नायलॉनच्या दोरीने गळा आवळून संजय सोनी यांची हत्या केली. हत्यानंतर संजय यांचा मृतदेह घेऊन हे सर्वच लोक संजय यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी, संजय साहेबांना वाटेत भोवळ आल्याने या लोकांच्या मदतीने त्यांना घेऊन आलो असे सांगत चालकाने सर्व लोकांना घरात प्रवेश मिळवून दिला. घरात आल्यानंतर सर्वप्रथम यांनी संजय सोनी यांचा मुलगा ध्रूमिल याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्यांची पत्नी पूनम सोनी यांचीही गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर तिजोरीतील सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि नगदी घेऊन पसार झाले. मात्र जाण्यापूर्वी हे तिन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून घरात दरोडा पडल्यानंतर या तिघांचीही हत्या झाली असा देखावा निर्माण केला.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या : सराफा व्यावसायिकाच्या एकाच कुटुंबातील तिन्ही लोकांची हत्या झाल्यानंतर शहरात नागरिकांमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला. नागरिकांचा संताप लक्षात घेऊन आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची गती वाढवीत चक्र फिरवली. सर्वप्रथम चालकाला अटक केली आणि त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुरुवातीला चार आणि नंतर दोन लोकांना मुद्दमालांसह अटक केली.