भंडारा - जिल्ह्याच्या पोलीस विभागाने हरवलेल्या लोकांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली. या माध्यमातून मागच्या सहा महिन्यात हरवलेल्या लोकांपैकी 99 टक्के लोकांना शोधून काढण्यात भंडारा पोलीस विभागाला यश आले आहे. हरवलेल्या लोकांमध्ये सर्वांत जास्त संख्या अल्पवयीन मुलींची आहे.
घरातून पळून जाण्याच्या प्रमाणामुळे या हरवलेल्या लोकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात या अल्पवयीन मुला-मुलींच्या जनजागृतीसाठी शाळेत आणि गावांमध्ये पोलीस विभागाच्यावतीने विशेष मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली.
भंडारा जिल्ह्यात मागील 5 वर्षात घरातून पळून जाणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींचे प्रमाण वाढले आहे. या मध्ये 14 ते 17 वयोगटातील मुलींचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. दरवर्षी हे प्रमाण वाढत असल्याने पालक आणि पोलिसांसाठी हा चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे या विषयाला पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने घेऊन विशेष मोहीम राबवली होती. त्याचा सकारात्मक निकालही पुढे आला आहे.
हेही वाचा - नव्या वर्षात कांद्यासह बटाट्याच्या किमती कमी होण्याची शक्यता
जिल्ह्यात 2018 मध्ये 742 स्त्री-पुरुष हरवल्याची तक्रार भंडारा जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाल्या होत्या. यात 220 पुरुष आणि 486 स्त्रियांचा समावेश होता. या पैकी 533 लोकांना पोलिसांनी शोधून काढले आहे. 2019 मध्ये एकूण 642 लोक हरवल्याच्या तक्रारी होत्या. नोव्हेंबर महिन्यापर्यंत 642 पैकी 617 लोकांना शोधून काढण्यात भंडारा पोलिसांना यश मिळाले.