भंडारा - कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने विविध प्रतिबंधात्मक कायदे लावले आहेत. या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पोलिसांची असते. मात्र, ही जबाबदारी पार पडताना पोलिसांना त्यांच्या आरोग्याची पण काळजी घ्यावी लागते. सध्या सुरू असलेला मास्कचा तुटवडा पाहता इतरांवर अवलंबून न राहता, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी यावर उपाय शोधत कर्मचाऱ्यांकडूनच मास्क बनवून घेतले आहेत.
हेही वाचा- 'कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाला, यास पुरावा नाही' - चीनी दुतावास
पोलीस बहुद्देशीय सभागृहात मागील तीन दिवसांपासून चार महिला पोलीस कर्मचारी, एक सहाय्यक फौजदार आणि एक शिवणकला शिकविणारी महिला असे एकूण 6 जण मिळून रोज हे मास्क बनवित आहेत. यासाठी एक हिरवा रंगाचा कापड वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिफारस केलेला. बाजारातून घेतला गेला आहे. त्याला आवश्यक त्या आकाराचे कापून चारही बाजूने शिवले आहे. त्याला रबरी पट्टी जोडून मास्क तयार केले आहे.
हा मास्क ज्या कापडाने बनला आहे त्यामधून श्वास घेण्यास सोपे जाते. तसेच त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणत स्वतःचे बचाव करता येईल, असे मास्क बनविणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. जिह्यातील सर्व पोलीस कर्मचारी, अधिकारी, आणि पोलीस विभागात काम करणाऱ्या सर्वांसाठी जवळपास 3 हजार मास्क बनविल्या जाणार आहेत. आतापर्यंत 2 हजार मास्क बनवून कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना वाटण्यात आले आहेत. उर्वरित मास्क दोन दिवसात तयार होणार आहेत. कोरोनाशी लढा देण्यासाठी कायद्याचे पालन करतानाच 24 तास आपले कर्तव्य बाजाविताना, स्वावलंबी होऊन जगण्याचा संदेश भंडारा पोलीस विभागाने दिला आहे.