भंडारा - संचारबंदीदरम्यान लोकांनी घराबाहेर निघू नये किंवा एकत्रित कुठे गोळा होऊ नये, असा कायदा आहे. मात्र, या कायद्याचा जुगार खेळणाऱ्या लोकांनी फज्जा उडवला आहे. त्यांना कायद्याची किंवा कोरोनाची भीती वाटत नाही. अशाच एका जुगार अड्ड्यावर छापा टाकत लाखनी पोलिसांनी 14 लोकांना ताब्यात घेतले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, लाखनी शहरातील शिव मंदिराजवळ असलेल्या तलावाच्या पारीवर बसून काही व्यक्ती जुगार खेळत होते. याची गोपनीय माहिती लाखनी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक नामदेव मंडलवार यांनी आपल्या ताफ्यासह आणि सी 60 चे कमांडो घेऊन छापा टाकला. याठिकाणी 14 व्यक्ती जुगार खेळताना आढळले. त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या सर्वांजवळून पोलिसांनी 43 हजार रुपये रोख तसेच मुद्देमला जप्त केला आहे. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून त्यांच्यावर संचारबंदी, जमावबंदी, अवैध जुगार खेळणे या विविध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास लाखनी पोलीस करत आहे. जिल्ह्यात अनावश्यक फिरणाऱ्या लोकांमुळे पोलिसांचा ताण वाढत आहे.