भंडारा - जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील वडद येथील शेत शिवारात निम्न चूलबंद प्रकल्पाचे पाणी शिरले असून, यामुळे शेकडो एकरातील धानपिक पाण्याखाली आल्याने विद्युतपंप व इतर साहित्याचे नुकसान झाले आहे. संबंधित विभागातर्फे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी गावकरी करीत आहेत.
सुरुवातीला पावसाने दगा दिला, आता प्रकल्पाच्या पाण्यामुळे पुन्हा शेतीतील पीक धोक्यात आले आहे.
अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या निम्न चूलबंद प्रकल्पात पाणी अडविण्यात आले आहे. प्रकल्पाची निर्मिती करण्यापूर्वी बुडीत क्षेत्र निर्धारित केले गेले होते. मात्र, सद्यः स्थितीत बुडीत क्षेत्रापेक्षा कितीतरी अधिक क्षेत्रात पाणी साचले आहे. प्रकल्पबाधित अनेकांना बुडीत क्षेत्राचा मोबदला मिळालेला नाही. शेतीचे सर्वेक्षण न करता परस्पर प्रकल्पाची किंमत वाढविण्यात आली आहे. बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरित न करता त्यांच्या अर्जाची टाळाटाळ केली जात आहे. साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्य विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे शेतकऱ्यांनी धाव घेतली. मात्र, अद्यापही हे प्रकरण रखडलेले आहे.
वीस दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दोन दिवसापासून हजेरी लावली आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे पीक धोक्यात आले होते. पाऊस आल्यानंतर त्यांना एक नवीन संजीवनी मिळेल अशी अपेक्षा असताना आता हे पीक प्रकल्पाच्या पाण्यामुळे धोक्यात आले आहे. रविवारी साकोलीमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे चुलबंद नदीच्या काठावर वसलेल्या वडद येथे प्रकल्पाचे पाणी शेतात शिरले, त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.
पीक पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे पिक खराब होऊन त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे गावाच्या सभोवतालच्या संपूर्ण शेतात पाणी साचल्यामुळे या शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार आणि विधानसभाचे अध्यक्ष असलेल्या नाना पटोले यांच्याकडे जाऊन चूलबंद प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राचे पुनसर्वेक्षण करून प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
तसेच निम्न चूलबंद प्रकल्पाचे दार बंद ठेवून वडदवासियांवर महापुराची परिस्थिती निर्माण करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.