भंडारा- देशासह राज्यात आणि जिल्ह्यात दर दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललेली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने काही नियमावली बनवली आहे. यापैकीच एक नियम म्हणजे नागरिकांनी घराबाहेर जाताना मास्कचा वापर करावा. मात्र, भंडारा जिल्ह्यातील नागरिक याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. भंडारा नगरपालिकेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांनी विशेष मोहीम राबवून विना मास्क फिरणाऱ्या लोकांकडून तब्बल 50 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
भंडारा जिल्ह्यात जुलै महिन्यात कोरोना रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 189 झाली आहे. यापैकी 99 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असली तरी अजूनही 86 व्यक्ती उपचार घेत आहेत. तर दोन व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दर दिवशी कोरोनाबाधित जिल्ह्यात आढळत आहेत. मात्र, अजूनही 50 टक्के नागरिक विना मास्क फिरताना दिसत आहेत.
निष्काळजीपणा करत असलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात अजून वाढू शकतो. म्हणून मुख्याधिकारी जाधव यांनी 9 तारखेपासून विशेष मोहीम सुरू केली आहे. सकाळी पावणे दहा ते साडेपाच पर्यंत कार्यालयीन कामकाज केल्यानंतर मुख्याधिकारी स्वतः इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घेऊन पोलिसांच्या मदतीने शहरातील वेगवेगळ्या चौकात व मुख्य मार्गावर उभे राहून ही मोहीम राबवत आहेत.
मुख्याधिकारी स्वतः हजर राहिल्यामुळे कर्मचारीही न थकता या कामात रात्री 8 वाजेपर्यंत स्वतःला झोकून देतात. पालिकांच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालकांना थांबविण्यासाठी हात दाखविताच काही नागरिक हा दंड चूकवण्यासाठी जीव धोक्यात घालून गाडी पळवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. तर काही चुक झाली म्हणून माफी मागतात आणि काही भांडण करतात. या सर्वांना मास्क तुमच्यासाठी, समाजासाठी किती महत्वाचे आणि फायद्याचे आहे, हे कर्मचारी पटवून देतात. 9 जुलै ते 17 जुलै या दरम्यान 388 लोकांवर कारवाई करून 50 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खरेतर मास्क वापरणे हे प्रत्येकाच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने स्वतःची आणि समाजाची काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करून नागरिकांना महत्त्व पटवून द्यावे लागते. या पेक्षा मोठे दुर्भाग्य कोणते असा प्रश्न उपस्थित होतो?