भंडारा - जिल्ह्यात एका शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप वाचविण्यात वनविभागाच्या चमूला यश मिळाले आहे. भंडारा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या तसेच कोका वन्यजीव अभयारण्यात लागून असलेल्या गावातील एका विहिरीत हा बिबट पडला होता. विहिरीतून बाहेर काढल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला जंगलात परत सोडण्यात आले.
भंडारा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या चितापूर गावातील शेतकरी मंगळवारी सकाळी आपल्या शेतावर गेला असता, त्याला शेतातील विहिरीतून काही आवाज येऊ लागला. विहिरीत बघितले असता, यामध्ये एक बिबट पडलेले त्याला दिसले. या विहिरीला कठडे नसल्याने शिकार शोधत असताना हा बिबट या विहिरीमध्ये पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट विहिरीत दिसताच शेतकऱ्याने याची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे आरआरयु पथक घटनास्थळी पोहोचले. दरम्यान बिबट विहिरीत पडल्याची वार्ता पसरताच बिबट्याला बघण्यासाठी गावकऱ्यांनीही मोठी गर्दी केली. या गर्दीमुळे बिबट्याला बाहेर काढण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांना दूर करण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले.
बिबट्याला वाचविण्यासाठी विहिरीत चौकोनी जाळे सोडण्यात आले. सुरुवातीला बिबट्या त्या जाळ्यात येत नसल्याने वनविभागाच्या पथकाला बरेच प्रयत्न करावे लागले. शेवटी बिबट जाळ्याच्या मधोमध आल्यावर त्याला सुखरूप वर काढण्यात आले आणि पिंजऱ्यात घालून वनविभागाच्या गडेगाव आगारात नेण्यात आले. तिथे पशु वैद्यकीय अधिकारी गुणवंत भडके यांनी त्याची तपासणी केली. या बिबट्याला कोणतीही ईजा झाली नव्हती, तो अगदी ठणठणीत असल्याने त्याला पुन्हा जंगल अधिवासात सोडण्यात आले.