भंडारा - जिल्हा ग्रीन झोनमध्ये असल्यामुळे २० तारखेपासून या जिल्ह्यातील काही व्यवसायांना, काही कामांना शिथिलता देण्यात आली आहे. मात्र दररोज पेक्षा मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले होते. मोठ्या प्रमाणात बांधकाम मजूर चौकात येऊन बसले होते. तर बँकेतही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित आल्याचे दिसत होते. या अगोदर फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असतानाही नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसत तर आता नव्याने जारी केलेल्या शासन आदेशाचे नागरिक कसे पालन करणार, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ज्या कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे त्यांना लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा आणि वाहतूक करता येणार आहे. मात्र हे सर्व करताना शासनाच्या आदेशाचे आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे. जसे कारखान्यात काम करणाऱ्या दोन शिफ्टमध्ये एक तासाचा अंतर असावा तसेच लंचटाईम मध्येही एक तासाचा अंतर असावा. प्रत्येक कामगारांचे आणि परिसराचे व्यवस्थित सॅनिटायझरेशन करण्यात आले पाहिजे. कोणीही बाहेर जिल्ह्यातून कामगार आणू नये. हे सर्व नियम न पडल्यास त्या कारखान्याच्या मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले.
20 तारखेला काही व्यवसायांना शिथिलता देण्यात येणार असल्याची माहिती लोकांना मिळाली आणि लोक घराबाहेर पडले. ज्या प्रमाणात लोकांची वर्दळ सुरू होती. दुचाकी, चारचाकी घेऊन लोक इकडे तिकडे फिरताना दिसत होते. त्यावरून संचारबंदी उठली की काय, असे चित्र निर्माण झाले होते. बांधकाम व्यवसायाला परवानगी मिळाली म्हणून मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग गांधी चौकात येऊन बसला होता शेवटी पोलिसांनी या सर्वांना बळजबरीने आपआपल्या घरी पाठवले.
बँकेतही मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. बँकेने या लोकांसाठी मंडप घातलेला होता. एक-एक फूट अंतरावर वर्तुळ बनविले होते. मात्र नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडाला होता. अत्यावश्यक गरजेसाठी म्हणून काही लोक आले असले तरी काही लोकांनी पासबुक प्रिंट करण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी केली होती. यावरून लोक किती गंभीर आहेत हे लक्षात येते.
फिरण्यावरचे निर्बंध हटविले असे समजून विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई सुद्धा केली.
एकंदरीत कोरोनामुळे आलेले आर्थिक संकट कमी करण्याच्या दृष्टीने शासनाने काही पावले उचलली असली तरी नागरिकांनी नियम तोडू नये, विनाकारण घराबाहेर पडू नये, तोंडाला मास्क बांधूनच कामासाठी निघावे, सोशल डिस्टन्सिंगची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.