भंडारा - भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतरही अद्याप या घटनेचा चौकशी अहवाल समोर आलेला नाही. नागरिकांना या अहवालाची प्रतीक्षा असतानाच, मंगळवारी पुन्हा नवीन चौकशी अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे ही चौकशी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घटना नेमकी कशी झाली हे समोर येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
समितीच्या पहिल्या अध्यक्षांची उचलबांगडी
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या आगीच्या घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयाला भेट देऊन एक चौकशी समिती नेमली. नागपूरच्या आरोग्य विभागाच्या सहसंचालक डॉक्टर साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार करण्यात आली होती. या समितीमध्ये नागपूर मेडिकल कॉलेजचे बालरोगतज्ज्ञ, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता, अग्निसुरक्षा अधिकारी नागपूर विभाग, आरोग्य सेवा नागपूरचे बायोमेडिकल तज्ञ आणि जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी अशा सहा जणांचा या समितीमध्ये सहभाग होता. मात्र आता या समितीच्या अध्यक्षांचीच उचलबांगडी करण्यात आल्यामुळे या घटनेच्या चौकशीला वेळ लागू शकतो.
मंगळवारी नवीन अध्यक्षांच्या समितीने केली पाहणी
जुन्या अध्यक्ष साधना तायडे यांची समितीच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी केल्यानंतर, नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर व्यास, आरोग्य विभागाचे आयुक्त रामास्वामी आणि मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे उपायुक्त रहांगडाले यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या अधिकाऱ्यांनी मंगळवारी रुग्णालयाची पाहाणी केली. आता पुन्हा एकदा नव्याने या घटनेची चौकशी होण्याची शक्यता असल्याने, चौकशी अहवाल लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तीन दिवसांत समितीचा अहवाल सादर करू असा विश्वास नागरिकांना दाखविला होता तो आता फोल ठरताना दिसत आहे.
चौकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा
रुग्णालयाला आग लागून या घटनेत दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही आग नेमकी कशी लागली, कोणाच्या चुकीमुळे लागली? या सर्वांची चौकशी करण्यासाठी समितीचे गठण करण्यात आले आहे. या समितीने सादर केलेल्या अहवालामधूनच सत्य परिस्थिती बाहेर येणार असल्यामुळे या समितीच्या चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे.