भंडारा: कृषि उत्पन्न बाजार समितीचा निकालात काँग्रेसला केवळ चार जागांवर समाधान मानावे लागले. या दोन्हीही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मात देण्यासाठी भाजपा, राष्ट्रवादी, शिंदे गट अशी अभद्र युती तयार करण्यात आली होती.
नाना पटोले यांना मात देण्यासाठी आखली योजना: वर्षभर पहिले झालेल्या भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये 52 पैकी 17 जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. त्या पाठोपाठ 13 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे ही नैसर्गिक युती पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करेल अशी अपेक्षा असतानाच भाजपामधील एका बंडखोर गटाला सोबत घेऊन नाना पटोले यांनी सत्ता स्थापन केली. तेव्हापासूनच नाना पटोले आणि राष्ट्रवादीमध्ये एक आंतरिक कलह निर्माण झाला आहे. या छुप्या कलहाचा उघड दर्शन हे पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हरवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी भाजपाशी हात मिळवणी करत, भाजप राष्ट्रवादी आणि शिंदे गट अशी अभद्र युती करीत शेतकरी एकता पॅनलच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या.
नानांना थांबविण्यात यश मात्र बहुमत नाही: भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता होती. काँग्रेस तर्फे शेतकरी सहकार पॅनलच्या माध्यमातून 18 उमेदवार रिंगणात उभे केले गेले. या उमेदवारांना हरविण्यासाठी निर्माण केली गेलेली भाजप- राष्ट्रवादी- शिंदे गटाच्या एकता पॅनलची निर्मिती केली गेली. आज या निवडणुकीचा निकाल हाती आला. तेव्हा एकता पॅनलने 18 पैकी नऊ जागा जिंकून काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी सध्या तरी थांबविले आहे. मात्र, असे असले तरी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारा बहुमत अजूनही नसल्याने पुढे फोडाफोडीच्या राजकारणातून सत्ता स्थापन करण्यासाठी या दोन्ही पॅनलतर्फे घोडेबाजार होईल एवढं निश्चित आहे.
लाखनी मध्ये भाजपाने गड राखला: दुसरीकडे लाखनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 पैकी 14 जागांवर एकता पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने भाजपाला त्यांची सत्ता राखता आली. तर काँग्रेसला केवळ चार जागेवर समाधान करावे लागले. भंडारा कृषी उत्पन्न बाजार समिती हा जिल्ह्याचा ठिकाण असूनही इथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व नावापुरताच. काँग्रेस केवळ सत्तेचा उपयोग घेत आहे ही बाब लक्षात घेऊन मतदारांनी आम्ही केलेल्या युतीच्या उमेदवारांना विजय केले आहे. लाखनीमध्ये संपूर्ण बहुमत मिळाले असून तिथे भाजपा सेनेची सत्ता स्थापना होईलच, सोबत भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही आमची सत्ता स्थापन होईल असे शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.
हेही वाचा: Building Collapsed In Bhiwandi भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली ४० ते ५० नागरिक अडकल्याची भीती