भंडारा - लॉकडाऊन दरम्यान अहोरात्र मेहनत घेणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या मदतीसाठी भंडारा टू व्हिलर मेकॅनिकल असोसिएशनने मदतीचा हात पुढे सरसावला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, गॅरेज बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, पोलीस, आरोग्य सेवक, डॉक्टर हे आपल्या कर्तव्यासाठी २४ तास तैनात आहेत. त्यामुळे त्यांचे वाहन कुठेही बंद पडले किंवा काही अडचण निर्माण झाली, तर त्यांच्या मदतीसाठी भंडारा मेकॅनिकल असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.
भंडारा जिल्हा मेकॅनिकल असोसिएशनद्वारे पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्यधिकारी यांना पत्र देण्यात आले आहे. यामध्ये कोरोना योद्धांच्या मदतीसाठी त्यांच्या वाहनामध्ये काहीही अडचण निर्माण झाली, तर ती मोफत दुरुस्त करुन देण्याबाबत लिहून देण्यात आले आहे. तसेच, त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील या संघटनेच्या मेकॅनिकचे मोबाईल नंबरही देण्यात आले आहेत.
लॉकडाऊन दरम्यान प्रत्येकजण आपापल्या परिने दुसऱ्यांना मदत करत आहेत. त्यामुळे मेकॅनिक असोसिएशनने देखील सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.