भंडारा - दहा दिवसांनंतर मंगळवारपासून दुर्गेचे संपूर्ण जिल्ह्यात विधीवत विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी(दि.9ऑक्टो)ला निघालेल्या बंगाली पध्दतीच्या विसर्जन मिरवणुकीत विशिष्ट पद्धतीची पूजा तसेच बंगाली नृत्याचे सादरीकरण हे आकर्षणाचे केंद्र होते.
शहराच्या काही भागात राहणाऱ्या बंगाली समाजातील लोक दरवर्षी मोठ्या उत्साहात दुर्गा उत्सव साजरा करतात. मराठमोळ्या शहरांमध्ये बंगाली लोकांचा दुर्गा उत्सव स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असते. दुर्गामातेसमोर स्त्रियांनी बंगाली पद्धतीने केलेले नृत्य हे सर्वांनाच मोहित करत होते. दरम्यान, बंगाली समाजातील स्त्रियांनी त्यांच्या पारंपारिक पद्धतीने हातामध्ये मातीचे भांडे घेऊन नृत्य केले. हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली.
देशात अनेक ठिकाणी दुर्गा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. तसेच प्रत्येक राज्यातील उत्सव साजरा कारण्याची पध्दत वेगळी असते. महाराष्ट्रातील मराठमोळ्या पद्धतीने नवरात्र साजरा करणाऱ्या भंडारा शहरात बंगाली लोकांची ही परंपरा विविधतेत एकतेचे प्रतीक आहे.