भंडारा - लाकडांच्या पैशाच्या वादातून होळी दिवशी सहा जणांनी एकाला मारहाण केली होती. नागपूर येथे उपचार दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या दावणीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ग्राम मूरदाडा या गावात ही घटना झाली असून आज गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृताचे नाव रामरतन गेंदलाल रहेकवार (वय 40 रा. मूळदाडा) असे आहे.
मृत रामरतनने वर्षभरापूर्वी सावराटोली येथील मोहपत नागपुरे याच्याकडून दोन हजार रुपयांची लाकडे खरेदी केली होती. मात्र, रामरतन लाकडाचे पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने मोहपत नागपुरे यांनी मंगळवारी सायंकाळी शालीक बानेवर यांच्या दुकानासमोर रामरतनला आपल्या पाच मित्रांसोबत मारहाण केली होती. मात्र, रामरतनचे कुटुंबीय घटनास्थळी असल्याने आरोपी तेथून पसार झाले. पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी जखमी रामरतनला दवणीवाडा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्याला गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. तेथूनही त्याला पुढे उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले होते. मात्र, रामरतन याचा दि.12 मार्च गुरुवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे आज मूरदाडा या गावी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - काम न करता शासकीय निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार - अजित पवार
आरोपी मोहपत नागपुरे हा घटनेच्या दिवशी सहा जणांना घेऊन मृताच्या घरी आला होता. त्याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या आधारे पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल करून चार जणांना अटक केली आहे. दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असून पुढील तपास दावणीवाडा पोलीस करीत आहेत.