भंडारा - लाखनी तालुक्यातील पळसगांव-कोलारी येथे गावाशेजारी शेतात अस्वल फिरत असल्याचे काही गावकऱ्यांना दिसले. संचारबंदीच्या काळात नागरिक घरातच राहत असले तरी वन्य प्राण्यांचा गावात मुक्त संचार पहायला मिळत आहे. तसेच उन्हाळ्याची चाहूल लागत असल्याने सुद्धा हे वन्य प्राणी गावाकडे पाण्याच्या शोधत येत आहेत.
अस्वल गावाच्या दिशेनेच येत असल्याचे लक्षात येताच तेथे असलेल्या गावकऱ्यांनी इतर गावकऱ्यांना याची माहिती दिली. बघता बघता लोकांची गर्दी त्याठिकाणी जमली. अस्वल गावात प्रवेश करू नये, म्हणून गावकऱ्यांनी आरडाओरड करून अस्वलाला हुसकावून लावले. याची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, अस्वालाचा शोध घेणे सुरू आहे. कोरोनामुळे संपूर्ण गावात संचारबंदी असल्याने लोकांच्या वावर कमी झाला. त्यामुळे जंगलाशेजारी असलेल्या गावाच्या शेतात किंवा रस्त्यांवर प्राणी दिसत आहेत.
उन्हाची तीव्रता वाढत असल्याने अस्वल पाण्याच्या शोधात गावकाच्या दिशेने आले असण्याच अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अस्वल गावाच्या शेतात दिसल्याने ते गावातही येऊ शकते, यामुळे गावकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.