भंडारा - भाजप सरकारने 2014 मध्ये शिवरायांच्या नावाने मते मागितली. त्याच सरकारने शिवरायांचे गड किल्ले भाड्याने देण्याचा निर्लज्जपणा दाखविला. अशा बेशरम सरकारला त्यांची जागा दाखविण्याची हीच खरी वेळ असून जोपर्यंत गड-किल्ल्यांविषयी घेतलेला निर्णय मागे घेतल्याचा अध्यादेश सरकार काढणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील शिवस्वराज्य यात्रा भंडाऱ्याच्या मुस्लिम लायब्ररी सभागृहात पोहोचली असताना लोकांना संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
हेही वाचा -आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस,राष्ट्रवादी बाजी मारेल - प्रफुल्ल पटेल
शिवरायांच्या स्वप्नातला खरा महाराष्ट्र लोकांना मिळवून देण्यासाठी आणि भाजप विरुद्ध लोकांच्या मनात असलेली खदखद बाहेर काढून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता उलथून पाडण्यासाठी शिव स्वराज्य यात्रा काढली असल्याचे मत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. येत्या विधानसभेमध्ये भाजपची सत्ता उलथून पाडण्यासाठी सर्वांनी एकजुटीने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी जमलेल्या लोकांना केले.
हेही वाचा -शिवस्वराज्य यात्रेत बाबा आत्राम अनुपस्थित; भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना पेव
लोकसभा निवडणूक आणि त्यातील मुद्दे हे वेगळे व विधानसभा निवडणुक आणि त्याची मुद्दे वेगळे आहेत. त्यामुळे लोकसभेत काय झाले हे विसरून विधानसभेत तुमच्या अडचणी, तुमचे मुद्दे, तुमचे प्रश्न याची जाणीव ठेवूनच मतदान करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा -सांगा मुख्यमंत्री, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा; खासदार अमोल कोल्हेंचा सवाल
शिवस्वराज्य यात्रेत मंचावर प्रफुल्ल पटेल जयंत पाटील शिव व्याख्यानकार अमोल मिटकरी उपस्थित होते. अमोल मिटकरी यांनी आपल्या भाषाशैलीने उपस्थितांचे मन जिंकून टाकले. यावेळी मिटकरी म्हणाले, की भाजपने काढलेली महाजनादेश यात्रा की मुख्यमंत्र्यांनी स्वतः ला सादर करण्यासाठी तर शिवसेनेने काढलेली जन आशिर्वाद यात्रा हे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री दाखवण्यासाठी काढलेली यात्रा आहे. मात्र, शिव स्वराज्य यात्रा ही महाराष्ट्राच्या मराठी मावळ्यांना एकत्रित करून लढा देण्यासाठी आहे.