भंडारा : शासकीय नियमानुसार बंधनकारक असलेल्या विविध नियमांना बगल देणाऱ्या सतरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत रासायनिक खताचे 10 परवाने, बियाण्यांचे 4 परवाने आणि कीटकनाशकाचे 3 परवाने निलंबित करण्यात आले आहे. मागील दोन महिन्याच्या कालावधीत भरारी पथकाने 30 कृषी सेवा केंद्रावर निलंबनाची कारवाई केली आहे.
शेतीचा हंगाम सुरू झाल्यामुळे बियाणे औषधे आणि खताची मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत जिल्ह्यातील काही कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला मिळाल्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यात कृषी विभागाने भरारी पथकाद्वारे कारवाईची मोहीम सुरू केली. शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठांचा पुरवठा करून योग्य दरात विक्री करण्याचे आदेश कृषी निविष्ठा विक्रेत्यांना देण्यात आले होते. मात्र, तरीदेखील अनेक विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर दर्शनी भागात कृषी निविष्ठांचा दर फलक लावलेला दिसला नाही. तसेच नोंदणी प्रमाणपत्र ठळकपणे लावलेले दिसले नाही. तर, पीओएस मशीनद्वारे खताची विक्री न करणे, रासायनिक खताची विक्री करतांना शेतकऱ्यांना एम फॉर्ममध्ये बिल न देणे. विक्री केलेल्या रासायनिक खतांची बिले न ठेवणे, साठा रजिस्टर व गोडाऊनमधील प्रत्यक्षात उपलब्ध असलेला साठा व पोस्ट मशीन मधील साठा यामध्ये तफावत असणे. बिल बुकवर कंपनीचे नाव व लॉट नंबर लिहिलेले नसणे या कारणांवरून ही कार्यवाही करण्यात आली आहे.
ज्या सतरा कृषी सेवा केंद्रावर कार्यवाही करण्यात आली. यामध्ये पवनी तालुक्यातील 8 कृषी केंद्र, लाखनी तालुक्यातील 2 कृषी केंद्र, साकोली तालुक्यातील 2 कृषी केंद्र तर भंडारा एक आणि लाखांदूर तालुक्यात एक कृषी केंद्रांवर कार्यवाही करण्यात आली आहे. या कारवाईत रासायनिक खतांच्या बियाण्यांचे कीटकनाशकांचे 17 परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या अगोदरही दोन वेळा अशाप्रकारे कारवाई करण्यात आल्या असून आतापर्यंत 30 कृषी सेवा केंद्रांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कृषी निविष्ठा विक्रेत्यावर रासायनिक खते नियंत्रण देशांतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये खुद्द जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विश्वजीत पाडवी, उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, मोहिम अधिकारी विकास चौधरी, गुणनियंत्रण अधिकारी प्रदीप म्हसकर, तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने आणि त्यांचा समूह उपस्थित होता. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अनियमितता असणाऱ्या कृषी सेवा केंद्राचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.