भंडारा - जिल्ह्याच्या पालांदूर येथील किटाळी जंगलात महिलेचे दागिने हिसकावणाऱ्या 2 आरोपींना भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 तासात अटक केली असून आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जयंत घनश्याम लोथे (वय 23 वर्षे) व पारस भोजराम पारसकर (वय 23 वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
माहिती देताना पोलीस निरीक्षक )गजानन कंकाळे पालांदूर पोलीस ठाण्यात एका महिलेने फसवणूक जबरी लूट झाल्याची फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती रस्त्याने जात असताना दोन अनोळखी तरुण तिच्या जवळ आले आणि तुझ्या आईची प्रकृती बरी नाही, ती पालांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असल्याची खोटी बतावणी केली. आईची प्रकृती बरी नाही, असे सांगताच या महिलेने आरोपींची कोणतीच चौकशी न करता त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या दुचाकीवर बसून आईला पाहण्यासाठी निघाली.महिला दुचाकीवर बसताच आरोपींनी दुचाकी किटाळीच्या जंगलात नेली तिथे तिच्यावर हल्ला करून कानातील सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून पसार झाले. या हल्ल्यानंतर घाबरलेली महिला तिथेच बेशुद्ध होऊन पडली. शुद्धीवर आल्यावर तिने रुग्णालय गाठले आणि त्यानंतर पालांदूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त होताच घटनास्थळ गाठत तपास सुरु केला. अवघ्या चार तासात पोलिसांनी या दोन्ही आरोपींना साकोली तालुक्यातील सासरा गावातून अटक केली आहे. या आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत केला असून भारतीय दंड संहिता कलम 394 (34) नुसार गुन्हा दाखल करून पालांदूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.